ग्रामसेवक चरणसिंग आसारामसिंग राजपूत (३६) आणि खाजगी व्यक्ती ज्ञानेश्वर तुकाराम आवारे ऊर्फ माऊली (५५, रा.कोळघर), अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांची गावातील सहान जागा खरेदी केली होती. ही जागा नावे करण्यासाठी त्यांनी ग्रामसेवक राजपूतची भेट घेतली असता त्याने तक्रारदाराकडे ८ हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर माऊली यानेही लाचेची रक्कम मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी दोन्ही आरोपींनी पंचांसमक्ष लाचेची मागणी केली. यानंतर माऊलीने लाचेची रक्कम तक्रारदाराकडून घेताच कोळघर येथील रस्त्यावर दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यानी रंगेहात पकडले. याप्रकरणी करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मध्यस्थामार्फत ८ हजारांची लाच घेताना कोळघरचा ग्रामसेवक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:05 IST