सोयगाव : तापमानात कमालीची वाढ झाल्याने उष्माघाताने पिंपळगाव (हरे) येथील एका २५ वर्षीय तरुणाचा निमखेडी येथील बसथांब्यावर मंगळवारी सकाळी ८ वाजता मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. अमोल दामोदर बावसकर असे मृताचे नाव आहे.
सोयगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी बहुतांश रस्त्यांवर संचारबंदीसदृश चित्र दिसून येत आहे. शेतातही शेतकरी, मजूर सकाळी आणि सायंकाळीच काम करीत आहेत. वाढलेल्या या तापमानाचा या वर्षातील पहिला बळी मंगळवारी गेल्याचे स्पष्ट झाले. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे) येथील प्रवासी अमोल दामोदर बावसकर ( २५) हा सोमवारी भर उन्हात दुपारी तीन वाजेच्या सुमारास बनोटी येथून गावी जाण्यासाठी निमखेडी बसथांब्यावर आला. बराच वेळ वाट पाहूनची वाहन न मिळाल्याने व उन्हाची होरपळ लागल्याने तो बसथांब्यावर बसला. त्यानंतर रात्रीही तो बसथांब्यावरच झोपल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास निमखेडी येथील बसथांब्यावर त्याचा मृतदेह आढळला. सोमवारी सोयगावचे तापमान ३९ अंश सेल्सियस होते. दिवसभर अमोल उन्हात होरपळून गेल्याने रात्री त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळताच सोयगाव पोलिस ठाण्याचे जमादार राजू बर्डे, रवींद्र तायडे आदींनी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अमोलचा मृतदेह सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी करून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची सोयगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.