छत्रपती संभाजीनगर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिसांसह बाहेरून १२ वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाले आहेत.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड सपत्नीक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ०१.३० वाजता त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने वेरूळकडे प्रयाण करतील. दुपारी ०३:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या पदवीदान समारंभास उपस्थित राहून ०४:३० वाजता एस.बी. महाविद्यालयात संविधान जागृती व अमृतमहोत्सवी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांच्या नेतृत्वात जवळपास ३ हजार पोलिस या बंदोबस्तासाठी तैनात असतील. उपराष्ट्रपती जाणार असणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत वेळेनुसार बदल केले जातील. त्याशिवाय बाहेरून ५ पोलिस उपायुक्त व ७ सहायक पोलिस आयुक्त या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारी बंदोबस्ताची रंगीत तालीमउपराष्ट्रपती व राज्यपाल जाणार असलेल्या मार्गावर शहर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बंदोबस्त व वाहनांची रंगीत तालीम केली. शिवाय, शनिवारी दिवसभर संपूर्ण शहरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे. यात कुठल्याही प्रकारचे ड्रोन, हॉट एअर बलूून, रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट्स लावण्यास मनाई असेल.