छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रगीत हे ‘वंदे मातरम्’च हवे “जन गण मन...’ नको. कारण ते त्या काळचे राजे जॉर्ज पंचम यांना खुश करण्यासाठी, त्याचा उदो उदो करण्यासाठी गायलेले गीत होय. आता अयोध्येनंतर राष्ट्रगीतासाठी संघर्ष करावा लागेल, असे वादग्रस्त विधान रामगिरी महाराज (सरालाबेट) यांनी छत्रपती संभाजीनगरात ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या उद्घाटनप्रसंगी केले.
थिएटर्समध्ये कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर रामगिरी महाराज म्हणाले की, जेव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा ब्रिटिश राजा जॉर्ज पंचमला खुश करण्यासाठी १९११ साली हे गीत सादर केले गेले. खरे तर वंदे मातरम् च राष्ट्रगीत हवे होते. राम मंदिराचा ५०० वर्षांनंतरचा लढा आपण जिंकला आहे. आता राष्ट्रगीतासाठी संघर्ष करावा लागेल. पूर्वीच्या चित्रपटातून सनातन धर्म, हिंदूंना बदनामच केलेले आहे. हिंदूंवर अन्याय, अत्याचारच झाले आहेत. हिंदू एकत्र आल्यावर काय होते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. अन्याय, अत्याचाराविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, रामायण, महाभारत, गीता या तत्त्वज्ञानाची सध्या गरज आहे. एक काळ असा होता साधू-संत म्हटल्यानंतर काहीही विकृत दाखवले जात होते. कधीही साधूबद्दल चांगली भूमिका कुठल्याही चित्रपटात दाखवली नाही. एखाद्या मौलानाबद्दल अशाप्रकारे विकृत दाखविण्याची हिंमत या चित्रपटांची झाली नाही. एखाद्या फादरबद्दल दाखविण्याची हिंमत झाली नाही. पण हिंदू सनातन धर्म हा श्रेष्ठ आणि सहनशील आहे याचा गैरफायदा घेऊन या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून आजपर्यंत हिंदू धर्माला, सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण आज आनंदाची गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. या चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून आणि योग्य अशा प्रकारे चित्रपट समाजासमोर येत आहेत. त्याचा परिणाम निश्चित पुढच्या पिढीसाठी होणार आहे, असेही रामगिरी महाराज म्हणाले.