छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासन अन् व्यवस्थापनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या चारचौघी सक्षमपणे जबाबदारी सांभाळत आहेत. एकीच्या हाती विद्यापीठाचे वित्त तर दुसरीच्या हाती अतिशय महत्त्वाच्या परीक्षा विभागाची कमान असून, दोघी विद्यापीठाच्या सर्वोच्च व्यवस्थापन परिषदेत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ पासून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार या दिनाच्या निमित्ताने करण्यात येतो. सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद अद्यापपर्यंत एकाही महिलेने भूषविलेले नाही. मात्र, काही वर्षांपासून विद्यापीठ कायद्याने निर्माण केलेल्या संवैधानिक पदांवर महिला सक्षमपणे कार्य करीत आहेत. सविता जंपावाड या दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून विद्यापीठाची आर्थिक बाजू वित्त व लेखाधिकारी म्हणून सक्षमपणे सांभाळत आहेत. विद्यापीठात गाजलेला १२७ कोटींचा घोटाळा असो किंवा इतर आर्थिक अनियमितता. त्यामध्ये नियमानुसार कार्यवाही करण्याची भूमिकाच त्यांनी निभावली आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनीही दोन वर्षांपासून परीक्षेसारख्या काटेरी मुकुट असलेल्या विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. निर्विघ्नपणे परीक्षा घेणे असो की, निकाल वेळेवर लावणे, गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई असो किंवा विविध प्राधिकरणांवरील पदाधिकाऱ्यांना तितक्याच खंबीरपणे सामोरे जात नियमानुसार कार्य केले आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर पदवीधर अधिसभा सदस्यातून विजयी झालेल्या डॉ. योगिता होके पाटील यांनीही विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे, भौतिक सुविधा निर्माण करणे, विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुविधा, सुरक्षिततेसाठी सतत पाठपुरावा केला आहे. युवक महोत्सवात तर त्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष तथा विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर विजयी झालेल्या डॉ. अपर्णा पाटील यासुद्धा व्यवस्थापन परिषदेत विविध विषय हिरिरीने मांडतात.
दोन अधिष्ठाता करतात प्रभावी कार्यकुलगुरू डाॅ. विजय फुलारी यांनी वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. वीणा हुंबे तर आंतरविद्याशाखेला डॉ. वैशाली खापर्डे यांची नियुक्ती केलेली आहे. या दोन्ही अधिष्ठाताही प्रभावीपणे कार्य करीत आहेत.