लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वर्षभराच्या कालावधीत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांना दृष्टी प्राप्त झाल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने नेत्रदान होऊनही ते अंधांच्या कामी आले नसल्याने आणि त्याचा संशोधनासाठी उपयोग केला जात असल्याने नेत्रदानाच्या संकल्पनेलाच तडा जात असल्याचे ‘चित्र’ आहे. जिल्ह्यात सरकारी आणि खाजगी अशा सात नेत्रपेढ्यांतर्फे नेत्रसंकलनाचे काम होते.गतवर्षी जिल्ह्यात १८९ नेत्रसंकलन झाले. सर्वसाधारणपणे शंभरामागे ३० ते ४० टक्के नेत्ररोपण होत असते, असे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. निलांबरी कानडे यांनी सांगितले. अनेक कारणांमुळे नेत्ररोपण टळते. प्रत्यक्षात डोळे काढल्यानंतरच ते रोपण करण्यायोग्य आहेत की नाही, हे समजते. रोपण करण्यायोग्य नसलेले डोळे संशोधनासाठी वापरले जातात. मृत्यूनंतर काढलेले डोळे आयबँकेत जतन करुन ठेवले जातात. हे डोळे नंतर गरजूंना दिले जातात. औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत १८९ नेत्रसंकलन होऊनही केवळ ५८ जणांवर रोपण करण्यात आले. ही आकडेवारी समाधानकारक नसल्याचे नेत्रशल्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्पष्ट केले. काही वेळा मानवी चुकीमुळे डोळा वाया जाण्याची शक्यता अधिक असते. नेत्रसंकलनाचा अधिकाधिक उपयोग अंधजणांसाठी व्हावा, ही समाजाची अपेक्षा असते. अशा वेळी नेत्रपेढ्यांची ‘दृष्टी‘ही सुधारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नेत्ररोपणाचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के असल्याचे चित्र असले तरी दान देणाऱ्यांनी ज्या भावनेने ते केले आहे याचा विचार नेत्रपेढ्यांना करणे आवश्यक ठरत आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या दात्याचे डोळे उपयोगी पडतीलच असे नाही. तरीही नेत्ररोपणाचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे मत मांडले जात आहे.
दान केलेल्या नेत्रांचा वापर संशोधनासाठी
By admin | Updated: July 9, 2017 00:42 IST