उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खोटे प्रमाणपत्र दिल्यावरून सदस्यत्व रद्द करण्यासह संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्र. २अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून सदस्य शब्बीर युन्नूस शेख हे विजयी झाले होते. मात्र निवडणूक लढवितेवेळी त्यांनी दाखल केलेले मुजावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे सांगत त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी याचिका सिद्दीक युन्नूस शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल केली होती. या अनुषंगाने सुनावणीदरम्यान तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आला होता. यातही शब्बीर युन्नूस शेख यांना मुजावर ओबीसी ३३९ असे कोणतेही जात प्रमाणपत्र वितरित झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. शिवाय शब्बीर शेख यांनी जात वैधतेचा प्रस्ताव समितीकडे सादर केला असल्याचेही पुराव्यावरून दिसून आले नाही. याच प्रकरणात शब्बीर शेख यांच्या विरोधात परंडा न्यायालयातही फिर्याद दाखल असून, यात न्यायालयाने गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निकालपत्रात म्हटले आहे. दाखल झालेल्या पुराव्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी शब्बीर शेख यांना सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचे आदेश दिले, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी शेख यांच्याविरुद्ध वेगळा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंद करावा, असेही आदेशात म्हटले आहे. फिर्यादी सिद्दीक शेख यांच्या वतीने अॅड. महादेव यादव यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
सदस्यत्त्व रद्द; गुन्हा नोंदविण्याचे आदेश
By admin | Updated: February 6, 2017 23:11 IST