वाळूज महानगर (औरंगाबाद ) : औरंगाबाद-नगर महामार्गावर बुधवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास बजाज गेटजवळ ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे पुण्याकडून प्रवासी घेऊन अकोला व जळगावकडे जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल बसेस एकापाठोपाठ ट्रकवर धडल्या. या अपघातात बसमधील २७ प्रवासी जख्मी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, पुणे येथुन रात्री ११ वाजेच्या सुमारास जवळपास ४० प्रवासी भरुन ट्रव्हल बस (क्रमांक) या दोन बसेस नगर-औरंगाबाद महामार्गावरुन अकोला व जळगावकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. या महामार्गावरुन या दोन्ही बसेस एकापाठोपाठ शहराकडे येत असतांना बजाज आॅटो कंपनीच्या गेटजवळ पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास समोर जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एम.एच.१६,ए.वाय.७५३१) च्या चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागुन पुण्याकडून अकोलाकडे भरधाव वेगाने येणारी ट्रव्हल बस (क्रमांक एम.एच.३०, डी.डी.४५००) ही या ट्रकवर जाऊन धडकली तर याच बसच्या पाठीमागे असलेली जळगावाकडे जाणारी दुसरी ट्रव्हल बस (क्रमांक एम.एच.१९, बी.वाय.१५१९) ट्रकला धडक देणाऱ्या बसवर जाऊन धडकली.
या अपघातामुळे साखरझोपेत असलेले दोंही बसमधील प्रवासी जखमी झाले आहे. अपघातातानंतर पाठीमागुन येणाऱ्या खुराणा ट्रव्हल बसमधील प्रवासी लक्कींिसंह व इतर प्रवाशांनी १०० क्रमांकावर संपर्क साधुन अपघाताची माहिती दिली व बसमधील आडकलेल्या प्रवाशांना पाठीमागील दरवाजा व खिडक्यातून बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान,या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सुरडकर व त्यांच्या साथीदारांनी अपघातस्थळ गाठुन या दोन्ही बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढुन पोलिसांच्या दोन वाहनातून तसेच १०८ रुग्णवाहिकेतून २७ प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.