बीड/परळी : मारहाण करून ऐवज लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या दोन टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना सोमवारी यश आले. आष्टी येथून दोघांच्या, तर परळीतून ५ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.आष्टी तालुक्यातील सालेवडगाव, खुंटेफळ, घाटापिंप्री शिवारात वस्त्यांवरील रहिवाशांना रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटीच्या घटना घडल्या होत्या. याशिवाय दुचाकीस्वारालाही अडवून लुटण्यात आले होते. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास गतिमान करून महादेव अशोक बांगल (रा. दादेगाव, ता. आष्टी), दीपक शरद माळी (रा. धामणगाव, ता. आष्टी) या दोघांना रविवारी रात्री उचलले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन जबरी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांचे चार साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपींना अंभोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सहायक निरीक्षक शिवाजी गुरमे, पो.हे.कॉ. भास्कर केंद्रे, मनोज वाघ, तुळजीराम जगताप, अंकुश महाजन, बाबासाहेब डोंगरे, सखाराम सारूक यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
दरोडेखोरांच्या दोन टोळ्या जेरबंद
By admin | Updated: February 6, 2017 23:04 IST