उस्मानाबाद : दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. वाढलेले औद्योगिकरण आणि बेसुमार वृक्षतोडीचा त्यावर परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाने शतकोटी वृक्ष लागवड हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासोबतच गावा-गावात, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र, झाडे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने उन्हाळा आला की कोवळी झाडे करपून जात आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातूनही हीच चिंताजनक बाब समोर आली आहे. वृक्षारोपण केल्यानंतर लावलेले झाड जगले की नाही याची पाहणी तब्बल ६० टक्के नागरिक करीत नसल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच समाजाने ही मानसिकता बदलण्याची जणू गरजच या निमित्ताने व्यक्त झाली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, तब्बल महिन्याभरानंतर पावसाने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी धरणाच्या घशाला कोरड कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसासाठी आता देवाकडे धावाही केला जातोय. परंतु, पावसास अनुरुप पर्यावरणाची निर्मिती करण्याकडे मात्र अनेकांचे दुर्लक्षच आहे. दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्यानंतरच आपणास वृक्ष लागवड अन् संवर्धनाचे महत्त्व कळते. त्यामुळे ठिकठिकाणी लागवडही सुरू होते. परंतु, एकदा का पाऊस पडला की, आपणच लागवड केलेल्या वृक्षाचा आपणास विसर पडतो. त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आपणास वाटत नाही. ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे आपली अवस्था आहे. प्रशासनाच्या बाबतीतही हीच बाब समोर येत आहे. गतवर्षी शतकोटी वृक्ष लागवड या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो झाडे लावण्यात आली. मात्र, त्यापैकी दहा टक्केही जगली नाहीत. यंदाही वृक्ष लागवडीची तयारी केली आहे. काही ठिकाणी लागवड सुरूही झाली आहे. मात्र, त्याच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हे येणाऱ्या काळातच समोर येणार आहे. (प्रतिनिधी)आतापर्यंत आपण किती झाडे लावली, या प्रश्नाच्या उत्तरादाखल ६० टक्के नागरिकांनी पाच ते दहा तर ३४ टक्के नागरिकांनी दहापेक्षाही अधिक वृक्षांची लागवड केल्याचे सांगितले आहे. तर सहा टक्के लोकांनी मात्र अद्याप एकही झाड लावले नसल्याचे समोर आले आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची देखभाल होणेही तेवढेच गरजेचे आहे. याच अनुषंगाने सर्वेक्षणात ‘तुम्ही लावलेले झाड जगले की नाही, याची पाहणी केली आहे का?’ असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यात तब्बल साठ टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले असून, चाळीस टक्के लोकांनी मात्र पाहणी केली असल्याचे सांगितले आहे. वृक्ष लागवड नेमकी कोणत्या ठिकाणी केली, हे जाणून घेण्यासाठी विचारलेल्या प्रश्नात तीस टक्के लोकांनी अंगणात तर ४० टक्के लोकांनी शेतात वृक्षांची लागवड केल्याचे सांगितले. रस्त्याशेजारी वृक्ष लागवड करणाऱ्यांची संख्या वीस टक्के असून, दहा टक्के लोकांनी मात्र सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड केल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘आपल्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे महत्त्व कोणते’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. यात पर्यावरण संतुलन आणि सावलीसाठी वृक्ष लागवड केल्याचे प्रत्येकी तीस टक्के लोकांनी सांगितले. फळ व फुलांसाठी लागवड केले म्हणणाऱ्यांची टक्केवारी पंधरा असून, वीस टक्के लोकांनी पर्जन्यमान वाढण्यासाठी तर पाच टक्क़े लोकांनी या सर्वच बाबी समोर ठेवून वृक्ष लागवड केल्याचे सांगितले आहे. ‘तुम्ही कोणत्या प्रकारची झाडे लावली’ असा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला होता. यात ६० टक्के नागरिकांनी फळांची तर २८ टक्के लोकांनी सावलीची झाडे लावल्याचे सांगितले. बारा टक्के लोकांनी मात्र शोभेच्या झाडे लावण्यास पसंती दिली आहे. पर्यावरण संतुलनासाठी जनजागृतीही आवश्यक आहे. त्यानुसार सर्वेक्षणात ‘वृक्ष लागवडीसाठी इतरांना प्रेरित केले काय’ असे विचारले असता यात ३० टक्के नागरिकांनी आपण इतरांना प्रेरित केल्याचे सांगितले आहे. वीस टक्के नागरिकांनी प्रेरित केले नसल्याचे तर उर्वरित पन्नास टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.अपेक्षा-सल्लानिसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची अत्यंत गरज आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत तेवढी झाडे लावली पाहिजेत, असे मत कृष्णा मारवाडकर यांनी या सर्वेक्षणात व्यक्त केले.‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे...’ ही म्हण प्रत्यक्षात उतरायला हवी. आपल्या जगण्यासाठी आॅक्सीजनची गरज असते व तो आपल्याला झाडापासून मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे, असे अभिजीत माने यांनी सांगितले.निसर्गच माणसाचा खरा मित्र आहे. झाडे माणसाला सावली, फळे, आॅक्सीजन, निवाऱ्यासाठी लाकूड, वस्त्रांसाठी कापूस देतात. यासाठी प्रत्येकाने झाडे लाऊन पर्यावरणाची निगा राखली पाहिजे. त्यामुळे पर्यावरणांचे संतुलन कायम राहून आरोग्य धोक्यात येणार नाही, असे गणेश सरडे यांनी सांगितले.वृक्ष लागवडीमुळे पर्जन्यमान, पर्यावरण संतुलन होऊन इतर फायदे मिळतात. परंतु, वाढत चाललेल्या वृक्ष तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून जोपासना करण्याची गरज रामविजय कापरे यांनी नोंदविली.
वृक्ष संवर्धनाकडे कानाडोळा
By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST