लातूर : प्रवासी वाहतूक करणाऱ्या बहुतांश खाजगी ट्रव्हल्सला आपत्कालीन खिडकी नसल्याचे आढळून आले आहे़ आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन परिवहन विभागाने खिडकीची सक्ती केली असली तरी अद्याप अनेक खाजगी ट्रॅव्हल्सला खिडक्या बसविण्यात आलेल्या नाहीत़ ज्या बसेसना खिडक्या लावण्यात आलेल्या नाहीत, अशा बसेसची तपासणी करून कडक कारवाई मोहिम हाती घेण्यात येणार आहे़ मंगळवार २७ आॅक्टोबरपासून आरटीओचे पथक मोहिम राबविणार आहे़ लातूर येथून मोठ्या प्रमाणात खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करतात़ लातूर-पुणे, मुंबई या मार्गावर सर्वाधिक खाजगी ट्रॅव्हल्सची संख्या आहे़ तसेच औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणीही लातूर येथून खाजगी बसेस धावतात़ राज्य परिवहन विभागाने आपत्कालीन खिडकी नसलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाईच्या सूचना केल्या असून तसे आदेशही आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत़ राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ त्यामुळे अनेकजण गावाकडे येतात़ प्रवाशांची होणारी गैरसोय व ट्रॅव्हल्स चालकांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले होते़ २७ आॅक्टोबरपासून कारवाई मोहिम गतीमान करण्यात येणार असून राज्यभरात एकाच वेळी ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले़ खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना आपत्कालीन खिडकीच्या सूचना देण्यात आल्या आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी येणाऱ्या ट्रॅव्हल्सला आपत्कालीन खिडकी नसेल तर तशा वाहनांची पासिंगही केली जाणार नाही़
ट्रॅव्हल्सला आपत्कालीन खिडकीची सक्ती
By admin | Updated: October 27, 2014 00:11 IST