औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून रविवारी पुणे मार्गावरील प्रवाशांना पळविणाऱ्या खाजगी वाहतूकदाराच्या एजंटाला रंगेहाथ पकडल्यावर त्याने चांगलाच राडा केला. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तिकीट बुकिंग कक्षाच्या खिडकीच्या काचेची तोडफोड केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याविषयी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी पुणे मार्गावरील प्रवाशांना एक एजंट बाहेर घेऊन जात असल्याचे वाहतूक निरीक्षक काळे आणि नजीब यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यास हटकले. प्रवाशांना बाहेर घेऊन जाण्यावरून यावेळी एजंट आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाद्बिक वाद सुरू झाला. शाद्बिक वाद सुरू असताना अचानक चिडून त्या एजंटने बुकिंग काऊंटरच्या खिडकीची तोडफोड केली. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास पकडून चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले. जाकेर खान असे नाव असलेल्या या व्यक्तीस पोलिसांनी ताकीद दिली आणि असा प्रकार पुन्हा करणार नसल्याचे लिहून घेऊन सोडून दिल्याचे स्थानक प्रमुख बोरसे यांनी सांगितले.
प्रवासी पळविणाऱ्या एजंटाने
By admin | Updated: June 14, 2016 00:09 IST