श्यामसुंदर गायकवाड , माळीवाडाप्राचीन वसा लाभलेल्या शरणापूर येथील भांगसी माता गडाच्या पायथ्याशी स्वामी परमानंदगिरी महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक, तसेच कृषी क्षेत्रातील विविध प्रकारच्या संकल्पना राबवीत गडाचा कायापालट केला आहे. गडाजवळील ५० एकर खडकाळ जमिनीत त्यांनी गुरुकुल शाळा, गोशाळा, शेततळे, बायोगॅस प्रकल्प, भाजीपाला, तसेच पाणीटंचाई लक्षात घेता ठिबक करून फळबाग फुलवली आहे. त्याचबरोबर अन्य झाडेही लावण्यात आली आहेत. निसर्गरम्य वातावरण व पर्यटनस्थळ यामुळे या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुकुलची स्थापनायेथील गुरुकुल शाळेची विद्यार्थीसंख्या ४३० च्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर धार्मिक व आध्यात्मिक पद्धतीचे शिक्षण दिले जाते. गोशाळेत जवळपास ७० लहान-मोठ्या गायी असून, या गायीच्या दुधाची विक्री न करता हे दूध सकाळी विद्यार्थ्यांना देण्यात येते. मुबलक जागा व जनावरे उपलब्ध असल्याने गेल्या वर्षी या ठिकाणी नवीन पद्धतीचा अवलंब करून बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे. गोबरगॅसमधील गॅस कॉम्प्रेसरच्या साह्याने एका मोठ्या लोखंडी टाकीत साठविण्यात येतो. विशेष म्हणजे या कॉम्प्रेसरला किट बसविण्यात आली असल्याने हे कॉम्प्रेसर गॅसवरदेखील चालते. वसतिगृहातील विद्यार्थी, कर्मचारी व भाविकांच्या स्वयंपाकासाठी पूर्वी दिवसभरात तीन व्यावसायिक सिलिंडर लागत असत. गोबर गॅस प्लँट सुरू केल्यामुळे दिवसभराच्या स्वयंपाक खर्चात जवळपास पाच हजार रुपयांची बचत झाली असल्याचे आश्रमाचे व्यवस्थापक एस.एस. पवार यांनी सांगितले.
भांगसीमाता गडाचा कायापालट
By admin | Updated: July 8, 2014 01:04 IST