औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अचानकपणे बंद करण्यात आलेली औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची सेवा शुक्रवारी दुपारी ३ वाजता कोणतीही घोषणा न करताच सुरू करण्यात आली. त्यामुळे तिला प्रवाशांचा अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मोजके प्रवासी आणि रिकाम्या डब्यांसह रेल्वे औरंगाबाद स्थानकावरून रवाना झाली. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- तिरुपती ही रेल्वे बंद करण्यात आली होती; परंतु उन्हाळी हंगामातील वाढणार्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची घोषणा करण्यात आली; परंतु ही घोषणा रेल्वे रवाना होण्याच्या केवळ एक दिवस आधी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. एका दिवसात कोणतेही नियोजन करण्याची वेळ दक्षिण मध्य रेल्वेने दिली नाही. त्यातही लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झालेला दिसून आला. त्यामुळे रेल्वेस्थानकावर ही रेल्वे आल्यावर प्रवाशांची संख्या अत्यंत कमी दिसून आली. जवळपास तीन डब्बे पूर्णपणे रिकामे होते, तर उर्वरित डब्यांमध्ये अनेक जागा रिकाम्या होत्या. औरंगाबादहून ही रेल्वे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे तिरुपतीला पोहोचणार आहे. त्यामुळे अनेक प्रवासी जालना, परभणी, पूर्णा, नांदेडसाठी बसले होते. रेल्वेची घोषणा अचानक केल्यामुळे प्रवासाचे नियोजन करण्यात धावपळ झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. शनिवारी ५.१० वाजता ही रेल्वे तिरुपतीहून औरंगाबादसाठी रवाना होईल. पन्नास टक्के अचानक घोषणा केल्यामुळे एका दिवसात प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळणार असा प्रश्न होता; परंतु ‘एसी’सह स्लीपर कोचमध्ये जवळपास ५० टक्के प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली.
तिरुपती रेल्वे रिकामीच रवाना
By admin | Updated: May 17, 2014 01:13 IST