छत्रपती संभाजीनगर : चॅटिंग स्कॅम करणाऱ्या विदेशी टोळीला, शहरातील इंजिनिअर तरुणीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कंपनी मालकाने हे कृत्य केले. पीडित तरुणीने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेत मायदेश गाठला. यानंतर तिने नोंदविलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात २७ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. अविनाश रामभाऊ उढाण, असे आरोपीचे नाव आहे.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार तरुणी ही इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. ती घटस्फोटीत असून, वर्ष २०२१मध्ये शहरातील लेडीज होस्टेलमध्ये राहत होती. तेव्हा तिने ॲग्रो केअर मशिनरीज या कंपनीत काम केले. यानंतर २०२५ मध्ये ती उल्कानगरी रोडवरील शंकरा रेसिडेन्सी येथील एफ व्होल्ट या कंपनीत नोकरीला लागली. तेथे काम करीत असताना कंपनी मालक अविनाश रामभाऊ उढाण सोबत ओळख झाली होती. तेव्हा त्याने थायलंड येथे मार्केटिंग मॅनेजरची चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे तिला सांगितले. या जॉबकरिता त्याने तिच्याकडून रोख दीड लाख रुपये घेतले. यानंतर जॉब कन्फर्म झाल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उढाणने तिला थायलंड येथे जाण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेऊन सोडले. तेथून ती बँकॉकला पोहोचली. तेथे हरप्रित सिंग हा तिला घेण्यासाठी आला होता. त्याने तिला कम्पोट गावी (कम्बोडिया) टॅक्सीने क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीत नेऊन सोडले. या कंपनीत तिच्याकडून स्कॅमिंगचे काम करून घेतले जात होते. उढाणने आपल्याला स्कॅमिंग काम करण्यासाठीच थायलंडला विक्री केल्याची तिची खात्री झाली. यानंतर दोन महिन्यांनी संबंधित कंपनीला २ हजार अमेरिकन डॉलर भरून सुटका करून घेतली. कम्बोडिया येथील भारतीय दूतावासाच्या मदतीने २१ ऑक्टोबर रोजी ती मुंबईला परतली. अविनाश याने तिला स्कॅमिंग कामाची पूर्व कल्पना न देता फसवणूक केली. तसेच बेकायदेशीर कामासाठी थायलंड व पुढे कम्बोडिया येथे पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला सहारा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
इमिग्रेशन अधिकाऱ्यांची झाली मदतमुंबईत दाखल झाल्यांनतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मदत केल्याने तिला आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आला. हा गुन्हा शहर पोलिसांकडे वर्ग केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. ही घटना जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पुढील तपास जवाहरनगर पोलिस करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : An engineer was trafficked to Cambodia under the guise of a job. She escaped with embassy help and filed a police complaint against the company owner for fraud and illegal trafficking after returning to India.
Web Summary : एक इंजीनियर को नौकरी के बहाने कंबोडिया में तस्करी कर भेजा गया। दूतावास की मदद से वह बच निकली और भारत लौटने के बाद कंपनी के मालिक के खिलाफ धोखाधड़ी और अवैध तस्करी की पुलिस में शिकायत दर्ज कराई।