जिंतूर : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने वाटप करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठींबा म्हणून २४ जून रोजी नांदेड - औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला़ तीन तास हा मार्ग बंद असल्याने हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे असलेली गावे स्टेट बँक आॅफ हैदराबाद व इंडिया यांना वर्ग करावीत, पीक कर्ज तातडीने वाटप करावे, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या याद्या तातडीने लावून अनुदान वाटप करावे, ज्यांची नावे सर्वेमध्ये नाहीत त्यांना पुन:सर्व्हे करून अनुदान द्यावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी २३ जूनपासून जिंतूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते़ उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या़विविध बँकांचे प्रतिनिधी जिंतूरात दाखल झाले, मात्र सकारात्मक तोडगा न निघाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार सकाळी ११ वाजेपासूनच ग्रामीण भागातील नागरिक तहसील कार्यालयासमोर जमा झाले़ दुपारी ११़३० वाजेपासून २़३० पर्यंत सलग तीन तास जिंतूर - नांदेड महामार्ग कार्यकर्त्यांनी रोखला़ तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जिंतूर - परभणी रस्त्यावर व जिंतूर - जालना रस्त्यावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या़ दरम्यान, जिल्हाधिकारी हे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी औरंगाबादला गेल्याने महसूल प्रशासनात जबाबदार अधिकारी कोणीही हजर नव्हता़ त्यानंतर उपोषणाचे पडसाद मंत्रालयात पडले़ मंत्रालयातून मुख्य सचिवांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना दखल घेण्यासंदर्भात पत्र दिले़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी संबंधित आश्वासनाचे पत्र विजय भांबळे यांच्या सुपूर्द केले़ त्यानंतर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला़ या रास्ता रोकोसाठी विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत, शरद अंभुरे, नानासाहेब राऊत, विश्वनाथ राठोड, रामेश्वर जावळे, राजेंद्र लहाने, गंगाधर जवंजाळ, पुंजारे गुरुजी, शिवाजीराव देशमुख, राजू पहारे, गजानन कांगणे, गजानन चव्हाण, शौकतलाला, भाई मियाँ, विजय वाकळे, उत्तम जाधव, बाळासाहेब घुगे, अॅड़ विनोद राठोड, वैजनाथ पुणेकर, वासेफ सिद्दीकी, अॅड़ कुमार घनसावंत, प्रताप सोळंके, जगन जाधव, गंगाधर तरटे, संजय अंभोरे, राजेंद्र नागरे, हनुमंत भालेराव हे उपस्थित होते़ (वार्ताहर)अन् उपोषण सुटलेमुख्य सचिवांनी सकारात्मरित्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले़ यामुळे आता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मुख्य सचिवांनी घेतली दखलसंबंधित उपोषणाची मुख्य सचिवांनी मंत्रालयात दखल घेऊन तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविले़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून भांबळे यांच्या मागण्याबाबत सकारात्मक पत्र आल्यानेच भांबळे यांनी उपोषण मागे घेतले़
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन तास महामार्ग ठप्प
By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST