पैठण (जि. औरंगाबाद) : पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून करण्यात आलेल्या १६ कोटी ५७ लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचा बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील अधिका-यांनी पंचनामा केला. हा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून विविध चौकशींच्या फे-यात अडकला आहे.या रस्त्याच्या नित्कृष्टतेबाबत २०१४ पासून तक्रारी होत्या. दरम्यानच्या काळात अनेक चौकशा झाल्या. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींंची चौकशी करण्याची जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे होती. अखेर बुधवारी उपअधीक्षक बी. आर. कुंभार, नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पैठण येथील रस्त्याची पाहणी करून रस्त्यावर पडलेल्या भेगा, फाटलेला रस्ता, यंत्राच्या साहाय्याने कोर कटिंग करून मटेरिअलचा पंचनामा केला व नमुने घेतले.यावेळी उपअधीक्षक कुंभार म्हणाले की, रस्त्याच्या कामाची चौकशी अंतिम टप्प्यात असून, स्पॉट पंचनामा करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता दुरुस्त करून लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
पैठणमधील ‘त्या’ रस्त्याचा अधिकाऱ्यांकडून ‘पंचनामा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 07:00 IST