छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यासाठी २३ फेब्रुवारीपासून क्रांतीचौकात मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपोषणकर्त्या रमेशे केरे पाटील यांची तपासणी केली तेव्हा त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मराठा समाजाला टीकणारे आरक्षण देण्यात यावे, सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना सर्व सवलती तातडीने देण्यात याव्यात,मराठा आंदोलकांवरील गुन्हे परत घ्यावे, मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घ्याव,यासह अन्य मागण्यासाठी मराठा संघटनांनी रविवारपासून क्रांतीचौकात मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले. या आंदोलनस्थळी मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे. तेथे विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी येतात काहीवेळ बसून निघून जात असल्याचे चित्र दिसते.
प्रशासनाकडून अद्याप संपर्क नाहीउपोषणकर्ते रमेश केरे यांनी पाणी पिण्यासही नकार दिल्याचे त्यांचे सहकारी सांगत आहेत. ही बाब पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रमुखांना कळविली. यानंतर डॉक्टर सत्येंद्र सानप यांनी आज दुपारी केरे पाटील यांची तपासणी केली. तेव्हा त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे तसेच पल्सरेटही घसरल्याचे समन्वयक रवींद्र काळे आणि राहुल पाटील यांनी सांगितले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळपर्यत प्रशासनाकडून कुणीही आले नसल्याचे त्यांनी नमूद केले.
उपोषण कर पण पाणी तरी घे...केरे हे तीन दिवसांपासून क्रांतीचौकात मंडपात झोपून आहेत. यामुळे त्यांच्या मातोश्री आणि पत्नीने अन्य नातेवाईकांसह आज दुपारी उपोषणस्थळी येऊन त्यांची भेट घेतली. उपोषण कर पण पाणी तरी घे...असे त्यांची आई म्हणाली. मात्र केरे यांनी पाणी पिण्यास नकार दिला.