छत्रपती संभाजीनगर : सण उत्सवादरम्यान बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या असताना दुसरीकडे चोरांचा वावरदेखील वाढला आहे. गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी आलेल्या चार महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या. ८ पेक्षा अधिक मोबाइल चोरांनी लंपास केले. बुधवारी टी. व्ही. सेंटर, मुकुंदवाडीसह गजानन महाराज मंदिर परिसरात प्रामुख्याने या घटना घडल्या. तर औरंगपुरा, वाळुजमधील घटनांची नोंद झाली नाही.
शिक्षिका असलेल्या कावेरी सुरडकर (रा. मयूरपार्क) या दि. २७ रोजी दुपारी टी. व्ही. सेंटर बाजारपेठेत खरेदीसाठी गेल्या होत्या. सायं. ४:३० वाजेच्या सुमारास पोलिस चौकीजवळ पूजेचे साहित्य खरेदी करत होत्या. यावेळी गर्दीत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याचे मनीमंगळसूत्र हिसकावून नेले. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दि. २६ रोजी दोन महागडे मोबाइल चोरण्यात आले होते. दुसऱ्या घटनेत लक्ष्मी मगर (रा. मुकुंदवाडी) या मुकुंदवाडी बाजारपेठेत खरेदी करत असताना त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमची सोनसाखळी तर मैत्रिणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांनी लंपास केली.
एकाच वेळी ३ महिला लक्ष्यऋतुजा थोरात (रा. रेणुकानगर) या दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिर परिसरात खरेदी करत होत्या. या दरम्यान गर्दीत चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली. ऋतुजा यांच्यासह अन्य दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीदेखील याच ठिकाणावरून चोरण्यात आल्या.
अनेक मोबाइल लंपास, नोंदी टाळल्यागजानन महाराज मंदिर परिसरातच खरेदी करणाऱ्या अमोल आव्हाड यांचा मोबाइल चोरांनी लंपास केला. त्याशिवाय, शहरातील टी.व्ही. सेंटर, क्रांती चौक, जवाहरनगर, मुकुंदवाडी व वाळुज परिसरातून ८ नागरिकांपेक्षा अधिकांचे मोबाइल चोरीला गेले. मात्र, त्याची केवळ गहाळ झाल्याची नोंद करण्यात आली.