सिल्लोड : शहरात रविवारी सकाळी शेजाऱ्याचीच दुचाकी चोरल्याने एका सराईत दुचाकी चोरट्याला सिल्लोड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या सोमवारी (दि. २५) रात्री ८ वाजता ईदगाहनगर येथून आरोपीला पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतले. सलीमशाह हैदरशाह (वय २४, रा. जांब (धाड), जि. बुलडाणा, ह.मु. ईदगाहनगर, सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सलीमशाह हा काही दिवसांपासून सिल्लोड येथे ईदगाहनगर येथील सासुरवाडीत वास्तव्यास आहे. रविवारी सकाळी ८ वाजता त्याने घराशेजारील सलमान इसाक पठाण यांची दुचाकी (एमएच २०, डीडब्ल्यू २०४२) चोरून नेली. सलमान पठाण यांनी तक्रारीत सलीम शहा याच्यावर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून चोरलेली दुचाकी हस्तगत केली. तो सिल्लोड शहरातून दुचाकी चोरून गावी जांब येथील मित्रांकडे विक्रीसाठी पाठवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दुचाकी चोरणारी ही टोळी असल्याचा पोलिसांना संशय असून त्याने आतापर्यंत किती दुचाकी चोरल्या, याचा पोलिस शोध घेत आहे.