उस्मानाबाद : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. हा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगत, वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असून, त्याचा फटका पर्जन्यमानावर बसला आहे. त्यामुळेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असून, याकडे कानाडोळा झाल्यास राजस्थानप्रमाणे महाराष्ट्राचेही वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी दिला.तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन डॉ. सिंह यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेतील जलसाक्षरता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, आ. मधुकर चव्हाण, आ. राणाजगजितसिंह पाटील, जि. प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याची गरज आहे. याकडे कानाडोळा झाल्यास मराठवाड्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेली पाणी बचत संकल्पना ही आपलीच आहे, असे प्रत्येकाने समजून पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करून कृषी मालाचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. याबरोबरच कृषी विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून जलशिवार योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोंचवावी. जलशिवारांची कामे नागरिकांना विश्वासात घेऊन केल्यास लोकसहभाग वाढेल, असा विश्वासही डॉ. सिंह यांनी व्यक्त केला. राजस्थानमध्ये पाण्याची बचत करण्यासाठी गाव पातळीवरील लोकांच्या सूचनेनुसार आराखडा तयार करण्यात येतो. यातून पाण्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामुळेच तेथील दुष्काळावर मात करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रारंभी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते तुळजाभवानीची प्रतिमा देवून डॉ. राजेंद्र सिंह यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
...तर महाराष्ट्राचे वाळवंट
By admin | Updated: February 22, 2015 00:37 IST