छत्रपती संभाजीनगर : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आयोजित १९वे विद्रोही मराठीसाहित्य संमेलन दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी येथील आमखास मैदानावर उत्साहात पार पडले. दि. २१ फेब्रुवारीच्या सायंकाळपासून विद्रोहाचा जागर सुरू झाला होता. संमेलनात २ नाटकांचे प्रयोग, ४ परिसंवाद, ३ कवी संमेलने, रॅप संगीत, गटचर्चा, नाट्यवाचन असे विविध प्रकारांचे सादरीकरण झाले. महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांतून प्रतिनिधींनी हजेरी लावली. अनेक मान्यवर, अभ्यासक, विचारवंतांनी आपले विचार व्यक्त केले. या राज्यव्यापी संमेलनासाठी ६,०१,०८२/- रु. इतका खर्च झाल्याचे खजिनदार के.ई. हरिदास, सावित्री महामुनी, सतीश चकोर, प्रा.भारत सिरसाट, वैशाली डोळस, धनंजय बोरडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
या संमेलनाचा जमाखर्च लेखा परीक्षक दिगंबर कचरे यांच्याकडून तपासून घेण्यात आला. आता तो धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात येईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष सतीश चकोर यांनी दिली. लेखापरीक्षणाच्या दरम्यान विद्रोही संमेलनाच्या बँक खात्यात ४ हजार रुपये शिल्लक होते. ते दि. ४ मे २०२५ रोजीच्या स्नेहमेळावा आणि सत्कार समारोहासाठी खर्च करण्यात आले आहेत. कमी खर्चात, शासकीय अनुदानाशिवाय दर्जेदार, उत्कृष्ट असे साहित्य संमेलन लोकसहभागातून, लोकवर्गणीतून आयोजित करता येणे शक्य असल्याचे संमेलनाने सिद्ध केले असल्याचा दावा चित्रकार राजानंद सुरडकर यांनी केला.
या संमेलनासाठी झालेला खर्च असा -भोजन खर्च ८१,००० रु., निवास व्यवस्था २९,५०० रु., मंडप साउंड खर्च ३,५०,००० रु., फ्लेक्स छपाई खर्च २०,००० रु., कार्यक्रम पत्रिका-संमेलनाध्यक्ष भाषण छपाई ३४,००० रु. खर्च झाला आहे. अ.भा. साहित्य संमेलनाला दिले जाणारे शासकीय अनुदान बंद करा, अशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी आहे. दर्जेदार संमेलन कमी खर्चातही यशस्वीरीत्या पार पाडता येते, याचा पुनरुच्चार राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी यांनी केला आहे.