छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यातील ग्रामदैवत खंडोबा मंदिरात वार्षिक यात्रा महोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षी चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी मंदिरातून मूळ मूर्तीची पालखी काढण्यात येते व दांडेकर यांच्या वाड्यात ही मूर्ती आणली जाते. तेथे लघुरुद्राभिषेक होतो व नंतर भाविक दर्शन घेत असतात. सुरक्षेच्या कारणास्तव मूळ मूर्ती मंदिरातून हलवू नये, याऐवजी उत्सव मूर्तीची पालखी काढावी अशी मागणी मंदिर विश्वस्तांनी पुरातत्त्व खात्याकडे केली होती. मात्र, गुरुवारी विश्वस्तांच्या बैठकीत प्राचीन परंपरा पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यंदा शनिवारी (दि.७) खंडोबा यात्रा व चंपाषष्ठी आहे. उपस्थित झालेल्या वादावर निर्णय घेणे गरजेचे असल्यामुळे गुरुवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक संग्राम ताठे, मनपा वॉर्ड अधिकारी भारत बिरारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, गावकरी हजर होते. यात शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच मूळ मूर्तीला कोणताही धक्का लागणार नाही व दरवर्षी प्रमाणे पालखी सोहळा व धार्मिक विधी होतील असेही दांडेकर परिवार व नागरिकांनी हमी दिली. परंपरा, प्रथा कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचे माहितीपत्रक प्रसिद्धीस देण्यात आली. त्यात अध्यक्ष रमेश चोपडे व सचिव साहेबराव पळसकर यांची स्वाक्षरी आहे.
उद्या निघणार पालखीशनिवारी चंपाषष्ठी साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता साताऱ्यातील प्राचीन मंदिरातून खंडोबाच्या मूळ मूर्तीची पालखी वाजत-गाजत निघणार आहे. मंदिरा जवळीलच दांडेकरांच्या वाड्यात मूळ मूर्ती नेण्यात येईल. येथे सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान ११ ब्रह्मवृंद रुद्राभिषेक करतील. यानंतर यात्रेत आलेल्या भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येईल. दांडेकर परिवारतर्फे यावेळी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. रात्री ८:३० वाजता पुन्हा वाजत-गाजत खंडोबाच्या मूर्तीची पालखी काढण्यात येईल व मूळ मंदिरात मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.