छत्रपती संभाजीनगर : शहरातील शासकीय बाल सुधारगृहातून नऊ अल्पवयीन मुलींनी अचानक पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुलींनी हातात दगड व लोखंडी रॉड घेत शहरातील रस्त्यांवरून पळ काढल्याने बाबा चौक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
छावणीतील शासकीय बाल सुधारगृहात विविध कारणातून घर सोडलेल्या, एखाद्या गुन्ह्यात मिळुन आलेल्या तर पिडितांना आश्रयास ठेवले जाते. या सुधारगृहात सुविधांची कमरता असल्याने यापुर्वी अनेक मुलींनी पलायन केल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. सोमवारी सकाळी ११०.३० वाजता नऊ अल्पवयीन मुलींनी एकाच वेळी सुधारगृहातून धुम ठोकली. ही बाब निरीक्षकांच्या लक्षात येईपर्यंत त्या दुरवर पळाल्या होत्या. मात्र, पळताना त्यांनी रस्त्यात कोणी अडवू नये, पकडू नये यासाठी दगड, लोखंडी रॉड घेतला होता. आरडाओरड करत सुसाट वेगात त्या पळत सुटल्याने नगर नाका ते भगवान महावीर चौक (बाबा चौकापर्यंत) एकच गाेंधळ उडाला होता. नेमके काय झालेय, हे काेणालाही कळत नव्हते. घटनेची माहिती कळताच दामिनी पथकासह छावणी पोलिसांनी बाबा चौकाच्या दिशेने धाव घेतली.
सात जणिंना पकडण्यात यशनऊ पैकी सात मुलींना जिल्हा व सत्र न्यायालयापर्यंत पोलिसांनी पकडले. तर दोघी मात्र निसटल्या. सातही जणिंना ताब्यात घेत पोलिसांनी तत्काळ त्यांची वैद्यकीय तपासणी करुन ठाण्यता नोंद केली. त्यानंतर त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले होते.
आठ दिवसांपासून खदखदपोलिसांच्या माहितीनुसार, या मुली गेल्या आठ दिवसांपासून अस्वस्थ होत्या आणि त्यांच्यात एक प्रकारची खदखद जाणवत होती. या सर्व नऊ मुली गेल्या पाच महिन्यांत बाल सुधारगृहात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांच्या पळण्यामागच्या कारणाचा तपास सुरू असल्याचे छावणीचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.