- विकास राऊत/ राम शिनगारेछत्रपती संभाजीनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये ओहर (जटवाडा) येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात गुरुवारी (दि. २७) जीवशास्त्राचा पेपर देणाऱ्या १२५ विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केंद्रातील परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरपासून १० किलोमीटर अंतरावरील ओहर या गावात बारावी, दहावीचे परीक्षा केंद्र आहे. बारावीच्या जीवशास्त्राच्या पेपरला ३८९ पैकी ३८७ विद्यार्थी परीक्षा देत होते. या केंद्राला तहसीलदार रमेश मुंडलोड, कर्मचारी श्रीधर दांडगे, रमेश तांबे, आशिष चौधरी आणि राजू सोनवणे यांच्या पथकाने दुपारी १२:४० वाजता भेट दिली. तेव्हा पाच खोल्यांतील १२५ विद्यार्थी एका हॉलमध्ये एका बेंचवर दोन असे बसविले होते. या हॉलमधील विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. तेव्हा १२४ विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्नांच्या ठरावीक उत्तरांना टीक मार्क केल्याचे आढळून आले. त्यावरून हा प्रकार सामूहिक कॉपीचा असल्याचेही स्पष्ट झाले.
संस्थाचालकाच्या कॅबिनमध्ये झेरॉक्स मशीनपरीक्षा केंद्रातील चार खोल्यांना कुलूप लावले होते. त्या खोल्या उघडण्याच्या सूचना तहसीलदारांनी केंद्र संचालकांना दिल्या. मात्र, केंद्र संचालकाने कुलपाच्या चाव्या संस्थाचालकांकडे असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तहसीलदारांनी चाव्या आल्याशिवाय केंद्राबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले. परीक्षा संपल्यानंतरही दोन तास चाव्या आणल्याच नाहीत. शेवटी कुलूप तोडणारा व्यक्ती बाेलावण्यात आल्यानंतर चाव्या आणल्या. तेव्हा संस्थाचालकाच्या कॅबिनमध्येच अत्याधुनिक झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर हे साहित्य आढळून आले. तसेच आतमध्ये संगणकही सुरू होते. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसविलेले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी संगणकाचा पासवर्ड देण्यास केंद्र संचालकाने नकार दिला.
इनकॅमेरा पंचनामाही कारवाई सुरू असतानाच तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे, केंद्रप्रमुख प्रभाकर काकडे हे केंद्रावर पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा पंचनामा केला. याविषयीची सविस्तर आठ पानी अहवालही तहसीलदार मुंडलोड यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
केंद्र संचालकासह पर्यवेक्षक विनामान्यतापरीक्षा केंद्राचे संचालक जी. जे. जाधव यांना जिल्हा परिषदेची वैयक्तिक मान्यता नसल्याचेही स्पष्ट झाले. तसेच केंद्रात सही केलेल्या १६ पर्यवेक्षकांपैकी एकाही पर्यवेक्षकाला मान्यता असल्याचे दिसून आले नाही. पाच ते सहा पर्यवेक्षकांकडे स्वीकृतीपत्र जे मंडळांना उद्देशून लिहिले आहे. मात्र, त्यास मान्यता नव्हती. तसेच छायांकित प्रतीवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असल्याचे आढळून आले. तसेच, या १६ पैकी ६ शिक्षक हे याच संस्थेच्या इतर शाळातील प्राथमिक शिक्षक असल्याचेही समोर आले आहे. तर काही पर्यवेक्षक इंग्रजी शाळेतील शिक्षक होते. त्यातही केंद्र संचालकास जिल्हा परिषदेची मान्यता नसताना विभागीय शिक्षण मंडळाकडून मान्यता मिळविल्याचे पत्रही व्हाॅटस्पॲपवर दाखविण्यात आले.
१५ मिनिटे दरवाजाच उघडला नाहीतहसीलदारांची गाडी केंद्राच्या गेटवर पोहोचल्यानंतर १५ मिनिटे गेट उघडण्यात आले नाही. शेवटी गाडीचे सायरन वाजविल्यानंतर गेट उघडले. १२.४० मिनिटांनी केंद्रात प्रवेश केलेले तहसीलदार ४. १५ वाजता केंद्रातून बाहेर पडले. परीक्षा सुरू असताना अक्षेपार्ह वाटणाऱ्या बंद खोल्या उघडण्याच्या सूचना केल्यानंतर चावीसाठी टोलवाटोलवी केली. शेवटी कुलूप तोडणारा पाचारण केल्यानंतर तीन तासांनी चावी देण्यात आली. त्यातून संस्थाचालकाचा मुजोरपणाही समोर आला आहे.
कॉप्या जाळून टाकल्याकॉपीचे पुरावे नष्ट केल्याचा संशयजटवाडा रस्त्यावरून परीक्षा केंद्राकडे तहसीलदारांचे वाहन वळताच कोपऱ्यावर उभ्या असलेल्या खबऱ्यांनी केंद्रात पथक येत असल्याची सूचना दिल्याचे दिसले. त्यानंतर १५ मिनिटांनी पथक पोहोचल्यानंतर १५ मिनिटे गेट उघडण्यात आले नाही. या वेळेत संपूर्ण केंद्रातील परीक्षार्थीनीकडून कॉप्या गोळा करून बॅगामध्ये भरून परिसरात अस्तव्यस्त टाकल्या होत्या. पथक केंद्रात पोहोचल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी या बॅगा उचलून गेटबाहेरील एका खोलीत नेऊन त्यातील कॉपी जाळून टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तहसीलदारांचे चार तास ठाणकेंद्रात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी सर्व काही संशयास्पद आढळल्यामुळे तहसीलदारांनी बंद खाेल्या उघडेपर्यंत चार तास केंद्रातच ठाण मांडले. गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे यांचे पथक आल्यानंतर त्यांनीही शाळेची झाडाझडती घेतली. शेवटी खोल्या उघडून त्यातील झेरॉक्स मशीन, प्रिंटर, स्कॅनरची पाहणी केल्यानंतरच तहसीलदार मुंडलोड यांनी केंद्र सोडले.
कॅम्पसमध्ये बॅगाचा खचकेंद्राच्या बाहेरील कॅम्पसमध्ये बॅगांचा खच असल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे सर्व बॅगा एका ठिकाणी ठेवलेल्या नव्हत्या. त्या सर्वत्र अस्ताव्यस्तपणे पडलेल्या दिसल्या.
चार रूमला लावले सीलकेंद्रातील चार खोल्या संशयास्पद होत्या. त्याच्या चाव्या केंद्र संचालक देत नसल्यामुळे तहसीलदार मुंडलोड यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने सर्व खोल्या सील केल्या. चावी मिळाल्यानंतर इन कॅमेरा ते सील तोडण्यात आले.
संस्थेच्या सचिवांचा अनधिकृत वावरराजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील केंद्रात संस्थेचा सचिव हा अनधिकृतपणे बसून होता. तहसीलदारांचे पथक आतमध्ये शिरताच सचिवाने केंद्रावरून धूम ठोकली. या सचिवांचा वडील शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपसंचालकांचा स्वीय सहाय्यक असल्याची माहितीही उपस्थितांनी दिली. केंद्रातील शिक्षक, केंद्र संचालक या स्वीय सहायकासच फोनवरून प्रत्येक घटनेची माहिती देत होते.
गुन्हे दाखल करण्यात येतीलतहसीलदाराकडून माहिती मिळाल्यानंतर तत्काळ गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकास केंद्रावर पाठविण्यात आले होते. तहसीलदारांच्या अहवालानंतर मिळाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तत्काळ करण्यात येईल.- अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग
तोंडी मान्यता घेतलीपरीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार नव्हता. दहावी व बारावीची परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एका हॉलमध्ये १२५ विद्यार्थी बसविण्यात आले होते. त्यासाठी शिक्षण विभागाकडून तोंडी मान्यता घेतली होती.-जी. जे. जाधव, केंद्र संचालक