नवीन तांदूळ येण्याआधीच भाताची चव ‘बिघडली’; जुन्या तांदळाच्या किमतीत वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 1, 2023 02:36 PM2023-12-01T14:36:55+5:302023-12-01T14:37:15+5:30

तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने, नवीन तांदळाचे भाव वधारलेले असतील.

The taste of rice 'spoiled' even before the arrival of the new rice; Increase in price of old rice | नवीन तांदूळ येण्याआधीच भाताची चव ‘बिघडली’; जुन्या तांदळाच्या किमतीत वाढ

नवीन तांदूळ येण्याआधीच भाताची चव ‘बिघडली’; जुन्या तांदळाच्या किमतीत वाढ

छत्रपती संभाजीनगर : नवीन तांदळाची चाहूल लागते, तेव्हा जुन्या तांदळाचे भाव कमी होत असतात, पण यंदा चक्र उलटे फिरले आहे. तांदळाचा नवीन हंगाम सुरू होतानाच, दुसरीकडे जुन्या तांदळाचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी जुन्या तांदळाच्या भाताची चव बिघडली आहे.

कोणत्या तांदळाचे वाढले भाव?
तेलंगणातून येणाऱ्या कोलम तांदळाचे भाव क्विंटलमागे २ हजार ते अडीच हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या ६० ते ६४ रुपये किलो दर आहे, तसेच बासमतीच्या तांदळातही मोठी वाढ झाली आहे. बासमती क्विंटलमागे ७०० रुपयांनी वधारून सध्या ९० ते १४० रुपये किलोदरम्यान विकला जात आहे.

का वाढले भाव?
यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने महिनाभर उशिराने पेरणी झाली. यामुळे नवीन तांदळाचा हंगाम महिनाभर उशिराने होत आहे. यात कर्नाटक राज्यात तांदळाचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात आहे.

कधी येणार नवीन तांदूळ?
डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर नवीन तांदळाची आवक वाढेल. जानेवारीत सर्व प्रकारचा नवीन तांदूळ उपलब्ध होईल.

नवीन तांदळाचे भाव काय असतील?
तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने, नवीन तांदळाचे भाव वधारलेले असतील. डिसेंबर महिन्यात नवीन तांदळाच्या भावातील तेजी-मंदी लक्षात येईल.

तेलंगणातून थोडीशी आवक सुरू
तेलंगणातून नवीन कोलम तांदळाची थोडीशी आवक सुरू झाली आहे. विदर्भात तांदळाचे उत्पादन समाधानकारक आहे.

बासमती खाण्यासाठी ठेवा खिसा गरम
दरवर्षी देशात सरासरी १०० लाख टनांपेक्षा अधिक बासमती तांदळाचे उत्पादन होत असते. मात्र, यंदा जुलैनंतर पावसाला सुरुवात झाली. यामुळे बासमती तांदळाचे उत्पादन ८ ते १० लाखांनी घटण्याची शक्यता तांदळाचे कमिशन एजंट व्यक्त करीत आहेत. परिणामी, बासमतीचे भाव वाढतील व नवीन बासमती तांदूळ खरेदीसाठी खवैय्यांना खिसा गरम ठेवावा लागणार आहे.
- टिंकू खटोड, तांदळाचे व्यापारी.

Web Title: The taste of rice 'spoiled' even before the arrival of the new rice; Increase in price of old rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.