छत्रपती संभाजीनगर : दौलताबादजवळील रामपूर तांडा शिवारातील एका खोल विहिरीत गेल्या तीन दिवसांपासून अडकून पडलेल्या नागाच्या जोडीला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात सर्पमित्रांना यश आले. ही दुर्मीळ आणि कौशल्यपूर्ण सुटका प्राणीमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांच्या तत्परतेचा उत्तम नमुना ठरली आहे.
शेतमालक राजपूत यांनी विहिरीत साप दिसल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ सर्पमित्र मनोज गायकवाड यांना संपर्क साधला. मनोज यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव अभ्यासक आशिष जोशी, शुभम साळवे, आणि सूरज पानखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीची खोली, अंधार आणि पाण्याच्या अस्थिर पातळीमुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक होते.
तथापि, योग्य नियोजन आणि संयमाच्या बळावर, या तिघांनी दोन्ही नागांना विहिरीतून बाहेर काढले. या कामात वन विभागाचे मार्गदर्शन घेतले गेले. सुटकेनंतर सर्पमित्रांनी दोन्ही नागांची प्रकृती तपासली आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.