छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीतर्फे शहरातील रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. उस्मानपुरा भागातील आनंद गाडे चौक ते रेल्वे पटरीपर्यंतच्या रस्त्यावर बरीच अतिक्रमणे होती. त्यामुळे काम सुरू करता आले नव्हते. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने रस्त्यात अडसर ठरत असलेली लहान-मोठी अतिक्रमणे मंगळवारी हटविली. आणखी काही अतिक्रमणे बुधवारी काढण्यात येणार आहेत.
आनंद गाडे चौक ते रेल्वे पटरीपर्यंतचा रस्ता १५ मीटर रुंद आहे. प्रत्यक्षात रस्ता कुठेही ५० फुट रुंद नाही. अनेक ठिकाणी तर रस्ता २० ते २५ फूटच शिल्लक राहिला आहे. अरुंद रस्त्यामुळे स्मार्ट सिटीला काम सुरू करण्यास अडचणी येत होत्या. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रस्ता मोकळा करण्यास सुरुवात करण्यात आली. मनपाने कारवाईचा बडगा उगारताच नागरिकांनी विरोध सुरू केला. वाहुळे यांनी नागरिकांची समजूत घातली. त्यानंतर कारवाईला सुरुवात केली. दिवसभरात २९ लहान-मोठी अतिक्रमणे हटविण्यात आली.
८०० मीटर लांब रस्ताआनंद गाडे चौक ते रेल्वे पटरीपर्यंत रस्त्याची लांबी ८०० मीटर आहे. मंगळवारी ६०० मीटरपर्यंतची अतिक्रमणे काढली. २०० मीटरमधील अतिक्रमणे बुधवारी काढण्यात येणार आहेत. ही कारवाई प्रभाग नऊचे वॉर्ड अधिकारी समीउल्ला, इमारत निरीक्षक शिवम घोडके, शुभम भोसले, रवींद्र देसाई यांच्यासह नागरिक मित्र पथकाने केली.