गंगापूर : तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथील मजुराने मंगळवारी (१३) रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तुकाराम मोहन राजपुत (३०) असे मृत मजुराचे नाव आहे.
तुकाराम राजपूत हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. मंगळवारी नाशिक येथील पाहुण्यांना भेटून तुकाराम घरी आला होता. रात्री साडे अकराच्या दरम्यान त्याच्या खोलीत काहीतरी आवाज आला. आईने दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिले असता तुकारामाने गळफास घेतल्याचे आढळून आले.
हे दृश्य पाहताच आईने आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाले. घटनेची माहिती गावाचे पोलिस पाटील यांनी गंगापूर पोलिसांना दिली. आज सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृताच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. त्याची पत्नी सध्या तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे.