छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित चंपा चौक ते जालना रोड येथे नगर भूमापन अधिकाऱ्यांसोबत संयुक्त मोजणी करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत. मागील तीन दिवसांपासून पोलिस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे संयुक्त मोजणीच्या कामाचा श्रीगणेशा झाला नाही. बुधवारीही नगर भूमापन, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. पोलिस बंदोबस्त नसल्याने मोजणी सुरू केली नाही.
सन १९९१ च्या शहर विकास आराखड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पंचायत समिती कार्यालय ते जालना रोडवर आकाशवाणीपर्यंतचा रस्ता १०० फूट दर्शविण्यात आला आहे. २०२५ च्या आराखड्यात हा रस्ता पंचायत समिती ते जिन्सी चौकापर्यंत १०० फूट, पुढे ६० फूट करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे चंपा चौकपासून उजवीकडे रस्त्याची अलाइनमेंटही बदलण्यात आली. त्यामुळे या भागातील काही मालमत्ताधारकांची अक्षरश: झोप उडाली आहे. बहुतांश मालमत्ताधारकांकडे जुनी बांधकाम परवानगीसुद्धा आहे. रस्त्याची रुंदी, अलाईनमेंट बदलणे, आदी अनेक कारणांमुळे हा रस्ता वादात सापडला आहे. रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू करण्यापूर्वीपासून महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांचे हा रस्ता रुंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच त्यांनी नगर भूमापन अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन रस्त्याची संयुक्त मोजणी करावी, अशी सूचना केली. त्यासाठी लागणारे पैसेही महापालिकेने भरले आहेत.
१४ जुलैपासून प्रयत्नमहापालिकेचा नगररचना विभाग आणि नगर भूमापन अधिकारी, कर्मचारी १४ जुलैपासून संयुक्त मोजणीसाठी प्रयत्न करीत आहेत. या भागात मोजणीसाठी पथक दाखल होताच बघ्यांची प्रचंड गर्दी जमा होते. छोट्या-छोट्या कारणांवरून वाद निर्माण होतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी महापालिकेने पोलिसांकडे केली. १५ जुलै रोजीही बंदोबस्त मिळाला नाही. बुधवारीही संयुक्त मोजणीसाठी पथक दाखल झाले. बंदोबस्त नसल्याने ते माघारी फिरले.
टीडीआरही दिलेमहापालिकेने चंपा चौक ते जालना रोड रस्त्यावर १०० फूट रुंदीच्या अनुषंगाने अनेक मालमत्ताधारकांना यापूर्वीच टीडीआरही दिले आहेत. त्यामुळे महापालिकेचे प्रशासन नवीन आराखड्यात कमी केलेली रुंदी ग्राह्य धरायला तयार नाही.
५०० पेक्षा अधिक मालमत्ता बाधितचंपा चौक ते आकाशवाणीपर्यंत रस्ता करताना भवानीनगर, कैलाशनगर, दादा काॅलनी, आदी भागांतील जवळपास ५०० पेक्षा अधिक मालमत्ता बाधित होत आहेत. अनेक वर्षांपासून रुंदीकरणाचा मुद्दा गाजत असल्याने मालमत्ताधारकांनीही घर खाली करण्याची मानसिकता तयार केली आहे.