छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी चिकलठाणा वेधशाळेत ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे.
शहरात ९ एप्रिल रोजी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यात मंगळवारी किंचित वाढ झाली आणि महिनाभरात सहाव्यांदा तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेला. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. थंड पेये, लिंबूपाणी, उसाचा रस यांची दुकाने गर्दीने फुलू लागली आहेत. काही भागांत नागरिक अंगणात, घरांच्या छतावर पाणी शिंपडत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
पारा ४३ अंशांवर जाणार१ मे आणि २ मे रोजी शहरातील तापमानाचा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. उष्णतेपासून संरक्षणासाठी नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, उन्हात जाणे टाळावे, तसेच डोक्यावर टोपी व डोळ्यांना गॉगल्सचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.