फुलंब्री : तालुक्यातील पाल येथे एका शेतकऱ्याचा शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचविताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता घडली. किशोर तेजराव जाधव ( ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. शेततळ्यात बुडालेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर जाधव यांना वर येत आले नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पाल शिवारात गट ५२ मध्ये शेतकरी किशोर तेजराव जाधव यांची ५ एकर शेती आहे. या शेतात एक एकर क्षेत्रात शेततळे असून पाण्याने तुडुंब भरलेले आहे. आज, बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान किशोर जाधव मुलगा आणि भाचा असे तिघे शेतात कामानिमित्त गेले होते. पाईप काढत असताना मुलाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. हे दृश्य पाहून जाधव यांनी पोहता येत नसतानाही त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मोठ्या प्रयत्नाने मुलाला काठावर आणले असता भाच्याने त्याला हात धरून बाहेर काढले.
मात्र, जाधव यांना वर येता आले नाही. दोघांनी आरडाओरडा केला पण मदतीस कोणीही आले नाही. मुलगा आणि भाच्याने गावात जाऊन माहिती दिली असटा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासांच्या नंतर चार वाजेच्या दरम्यान जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मृतदेह फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करिता पाठविण्यात आला आहे. शेतकरी किशोर जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास राठोड करीत आहेत.