छत्रपती संभाजीनगर : कार चालवत असताना अचानक फिटचा त्रास सुरू झाल्याने स्टिअरिंगवरचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. बुधवारी दुपारी ३ वाजता राज पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. त्यात कारमधील दाम्पत्याने सीटबेल्ट लावलेले असल्याने सर्व एअरबॅग्ज उघडून दाम्पत्याला कुठलीही इजा झाली नाही. गेल्या वीस दिवसांतील दुभाजक तोडून घडलेला सलग याच जागेवरील हा दुसरा अपघात आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता राज पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेला हा अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सूरज राजपूत हे पत्नीसह कारने (एमएच २० ईजे ४३३४) हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेेने जात होते. हायकोर्ट सिग्नलवरून निघून सेव्हन हिल उड्डाण पुलावर जात असताना हायकोर्टाच्या पुढे त्यांना फिट आली. त्यात त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यातच पाय एक्सलेटरवर पडून कार थेट पंपाच्या समोरील दुभाजकाला धडकली. त्यामुळे दुभाजक व सजावटीची कुंडी तुटून रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला जाऊन पडले तर अर्धी अधिक कार दुभाजकावर राहिली. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पाेलिस ठाण्याचे अंमलदार मोतीराम होलगडे, अमोल आहेर, मदन गोरे यांनी धाव घेतली.