छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने जवळपास संत एकनाथ रंगमंदिराच्या डागडुजीवर जवळपास ८ कोटी रुपये खर्च केले. डागडूजीनंतर अडीच वर्षांतच सभागृहाच्या मुख्य सिलिंगला गळती लागल्याने ती प्रेक्षकांवर कोसळत आहे. विशेष बाब म्हणजे नाट्यगृह एका खासगी एजन्सीला मनपाचे चालविण्यासाठी दिले आहे. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाचे काम स्मार्ट सिटीकडून करण्यात येत असून, हे काम आतापर्यंत ६० टक्केच पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिने नाट्यप्रेमींना प्रतीक्षा करावी लागेल.
मनपाच्या उस्मानपुरा येथील नाट्यगृहाची दयनीय अवस्था झाली होती. नावाजलेल्या मराठी कलावंतांनी या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून काही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनावर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. प्रशासनाने २०१७ मध्ये डागडुजीसाठी संत एकनाथ रंगमंदिर बंद करून डागडुजीला सुरुवात केली. हळूहळू त्यातील कामे वाढत गेली. मूळ अंदाजपत्रक २.५ कोटींचे होते. कामे वाढल्याने ते ८ कोटींपर्यंत गेले. निधीची जुळवाजुळव करून दोन वर्षांनंतर काम पूर्ण झाले. विद्युत व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, पडदे, रंगरंगोटी, सौंदर्यीकरण इ. कामे करण्यात आली. २२ जानेवारी २०२२ रोजी रंगमंदिराचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले होते. एका खासगी एजन्सीला मनपाने रंगमंदिर चालविण्यासाठी दिले. रंगमंदिराची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती एजन्सीकडे आहे. त्यानंतरही सिलिंग कोसळणे, पाण्याची गळती इ. प्रकार सुरू झाले. खुर्च्यांची अवस्थाही वाईट आहे. तोडफोड झालेल्या खुर्च्याही एजन्सी लवकर दुरुस्त करीत नाही.
संत तुकाराम नाट्यगृहाला ३ महिने अवकाशसंत तुकाराम नाट्यगृहाची डागडुजी स्मार्ट सिटीमार्फत करण्यात येत असून, आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख इम्रान खान यांनी दिली. अंतर्गत डागडुजी, इलेक्ट्रिक वर्क, अग्निशमन यंत्रणा, विद्युत, स्टेजवरील विद्युत व्यवस्था, साऊंड सिस्टीम बसविण्याचे काम सुरू आहे. वातानुकूलित यंत्रणेच्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून परत निविदा काढली. त्यामुळे कामांना थोडा विलंब होतोय. ३ महिन्यांत सर्व कामे पूर्ण होतील.