दलाई लामांना पाहताच तिबेटियनांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:40 AM2019-11-23T11:40:14+5:302019-11-23T11:58:48+5:30

अहिंसेच्या मार्गानेच तिबेट स्वतंत्र होणार असल्याचा विश्वास दिला

tears flowing into the eyes of the Tibetans when they saw Dalai Lama | दलाई लामांना पाहताच तिबेटियनांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

दलाई लामांना पाहताच तिबेटियनांच्या डोळ्यांत तरळले अश्रू

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी धर्मगुरू दलाई लामा येणार म्हणून अनेक दिवसांपासून त्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असलेल्या तिबेटियन नागरिकांना दलाई लामांचे दर्शन होताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले... आपण स्वप्न तर पाहत नाही ना, असे त्याक्षणी अनेकांना वाटले. यावेळी ‘अहिंसेच्या मार्गाने तिबेट स्वतंत्र होईल’ असा विश्वासही दलाई लामा यांनी निर्वासित झालेल्या तिबेटियन नागरिकांना दिला. एवढ्या जवळून झालेली ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीय होय, आमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होय, अशीच भावना तिबेटियन बांधवांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. 

जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी धर्मगुरू दलाई लामा यांचे औरंगाबादेत आगमन झाले. त्यानंतर ताज हॉटेलमध्ये त्यांना नेण्यात आले. दरवर्षी हिवाळ्यात स्वेटर्स घेऊन शहरात विक्रीसाठी येणाऱ्या तिबेटियन बांधवांना प्रत्यक्षात धर्मगुरूंची भेट येथे होणे म्हणजे आपले जीवन सार्थक झाले असेच या सर्वांना वाटते. तिबेट स्वतंत्र होण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे राजकीय नेते व धर्मगुरू अशा दोन्ही अर्थाने तिबेटियन बांधवांमध्ये दलाई लामा यांचे स्थान मोठे आहे. ते कायम तिबेटियनांच्या हृदयात वसलेले असतात. एरव्ही हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे धर्मगुरूंची भेट घेण्यासाठी तिबेटियन बांधव जात असतात; पण तिथे दूरून दर्शन होते. मात्र, आज ताज हॉटेलच्या बाहेर बसलेल्या या तिबेटियन बांधवांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. दलाई लामा यांनी जवळ येऊन त्यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यावेळेस प्रत्येकाला ‘आकाश ठेंगणे’ झाले असेचे वाटत होते. काही महिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते, तर पुरुषांच्या अंगावर शहारे आले होते. दररोज ज्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतो ते धर्मगुरू प्रत्यक्ष समोर उभे आहेत हीच त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी भेट होती.

ज्येष्ठ सदस्य एस. डी. छौपेल यांनी सांगितले की, दलाई लामा यांनी आम्हाला रस्त्याच्या कडेला बसलेले पाहिले तेव्हा ते आमच्या जवळ आले व म्हणाले की ‘आपली मायभूमी तिबेट सोडून आपणास भारतात राहावे लागते, याचे दु:ख वाटून घेऊ नका. भारतीय आपले भाऊ-बहीणच आहेत. त्यांच्याशी मिळूनमिसळून राहा, आनंदी राहा. भगवान गौतम बुद्धांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला आहे. आपणही त्याच अहिंसेच्या मार्गाने लढा देत आहोत. अहिंसेच्या मार्गाने लढा देत असताना यश मिळण्यास वेळ लागतो. मात्र, यश मिळते. अहिंसेच्या मार्गानेच तिबेटला स्वातंत्र्य मिळणार आहे. यामुळे तुम्ही मनात कोणतीही शंका आणू नका. अहिंसेच्या मार्गानेच आयुष्याची वाटचाल करा, असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला. धर्मगुरूंनी दिलेल्या संदेशाचा प्रत्येक शब्दना शब्द आमच्या हृदयात साठवून ठेवला आहे, असेही छौपेल म्हणाले. आपणास धर्मगुरू भेटले हे अजूनही काही जणांना स्वप्नच वाटते, असेही भावना तिबेटियन बांधवांनी व्यक्त केल्या. 

औरंगाबादला विसरणार नाही
तिबेटियन बांधवांनी सांगितले की, आज आमच्या धर्मगुरूंशी आमची भेट घडवून आणली, हा दिवस आमच्यासाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरला. ही भेट घडवून आणल्याबद्दल आम्ही औरंगाबादकरांना कधीच विसरणार नाही. आम्ही जिथे असू तिथे सदैव औरंगाबादकरांच्या कल्याणाची, या शहराच्या विकासाचीच कामना करू.

चिमुकल्याला घेतले जवळ 
लामा यांच्या स्वागतासाठी तिबेटीयन नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर विमानतळाच्या बाहेर निघताना एक तिबेटीयन मुलगा स्वागतासाठी लामा यांच्या दिशेने जाऊ लागला. या चिमुकल्यास जवळ बोलावून दलाई लामा यांनी त्याच्याशी मोठ्या आस्थेवाईकपणे चौकशी केली. लामा यांच्या स्वागत मार्गावर फुलांची उधळण करण्यात येत होती. 

दलाई लामा यांचे जोरदार स्वागत
दलाई लामा यांच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी शुक्रवारी सकाळपासूनच विमानतळ परिसरात उत्स्फूर्त गर्दी केली होती.  दलाई लामा हे सकाळी ८.१७ च्या सुमारास दिल्लीहून औरंगाबादसाठी निघाले. दहाच्या सुमारास त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. यावेळी वॉटर सॅल्युटही देण्यात आला. विमानातून उतरताच शहराचे प्रथम नागरिक महापौर नंदकुमार घोडेले यांनी दलाई लामा यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी धम्म परिषदेचे मुख्य निमंत्रक हर्षदीप कांबळे सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्यासोबतच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक डी. जी. साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. दलाई लामा यांच्या आगमनानिमित्ताने मुंबई, नाशिकसह औरंगाबाद येथील चित्रकारांनी विमानतळ परिसरात आकर्षक प्रदर्शन साकारले होते. त्याची पाहणी करीत बौद्ध उपासकांना दलाई लामा यांनी आशीर्वाद दिले. 

Web Title: tears flowing into the eyes of the Tibetans when they saw Dalai Lama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.