औरंगाबाद : पाणी भरल्यानंतर बोर्डवरील पिन काढताना विजेचा धक्का बसल्याने तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. निशा राजेंद्र भालेराव (२०, रा.मिलिंदनगर, उस्मानपुरा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी मिलिंदनगरात निशा हिने इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्याने पाणी भरले. मोटार बंद करण्यासाठी बोर्डवरील पिन काढताना तिला विजेचा धक्का बसला. तिला संतोष वाघमारे, राहुल सोनुने यांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. निशाच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.