BJP Suresh Dhas: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात उपस्थितांना संबोधित कराताना भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या कारनाम्यांचा पाढा वाचला. धनंजय मुंडे यांच्या मदतीने वाल्मीक कराडने कुठे-कुठे आणि किती संपत्ती जमा केली आहे, याची यादीच यावेळी आमदार धस यांनी वाचून दाखवली.
सुरेश धस म्हणाले की, "जुने नवे थर्मल प्लँट्स, छोट्या-मोठ्या कंपन्यांकडून आका हप्ता घेत होता. कोरोमंडल नावाची सिमेंट कंपनी या खंडणीला वैतागून राज्यातून निघून गेली. परळीतील छोट्या आकांना २०२२ मध्ये ईडीची नोटीस आली आहे. ही नोटीस आली कारण, या आकाने माल काही कमी नाही जमवला. माजलगाव तालुक्यात एका व्यक्तीच्या नावावर आकाची ५० एकर जमीन आहे, माजलगाव तालुक्यातच काकडे नावाच्या कराडच्या वॉचमनच्या नावावर १५ ते २० एकर जमीन आहे, बार्शी तालुक्यात वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर ५० एकर जमीन आहे, मनीषा नरोटे नावाच्या महिलेच्या नावावर १० एकर जमीन आहे, जामखेड तालुक्यातील दिघोळला ज्योती जाधवांच्या नावावर १५ एकर जमीन आहे," असा दावा आमदार धस यांनी केला आहे.
"पुण्यातील वैशाली हॉटेलच्या मागे एका बिल्डरकडून वाल्मीक कराडने ७ आणि विष्णू चाटने १ असे एकूण ८ शॉप बुक केले आहेत. या एका शॉपची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे, म्हणजे एकूण ४० कोटी रुपयांचे शॉप पाटील नावाच्या बिल्डरकडून घेण्यात आले आहेत. या बिल्डरला मी भेटलो. तो म्हणाला वाल्मीक कराडने ज्या बिल्डिंगमध्ये ८ शॉप घेतले आहेत त्या बिल्डिंगचे ३५ कोटी रुपयांचे टेरेसही तो मागत होता. मात्र मी ते दिले नाही. अॅमेनोरा पार्क, अन्ड्रोना टॉवर इथं एका फ्लॅटची किंमत १५ कोटी रुपये इतकी आहे. या टॉवरमध्ये वाल्मीक कराडने अख्खा फ्लोअरच विकत घेतला आहे. हा फ्लोअर कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. त्याची एकूण किंमत ७५ कोटी रुपये होते," असंही सुरेश धस यांनी सांगितलं आहे.
"जमिनी आणि फ्लॅट या दोन संपत्तीतच वाल्मीक कराड १०० कोटी रुपयांच्या पुढे जात आहे. म्हणजे तो आपोआप ईडीच्या दरबारात जाणार आहे. कारण १०० कोटी रुपयांच्या पुढे गेलं की ते प्रकरण ईडीकडे जाते. वाल्मीक कराडने मावळ भागात गोरख दळवी आणि अनिल दळवी हे बापलेक ठेवले आहेत. त्या भागात काही विकायला निघालं की लगेच हे तिथं जातात. म्हणजे प्रत्येक भागात यांचे लोक आहेत. हा वाल्मीक कराड एखाद्या दिवशी अंबानींनाही मागे टाकतो की काय, अशी शंका माझ्या मनात येते," असा टोलाही सुरेश धस यांनी यावेळी लगावला आहे.