खिडक्यांना अखेर लोखंडी ग्रील
लोकमत इफेक्ट : सुरक्षेसाठी ३४० खिडक्यांना बसवले लोखंडी ग्रील
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारून एका कोरोना रुग्णाने सप्टेंबरमध्ये आत्महत्या केली होती. येथील खिडक्यांना लोखंडी ग्रीलच नसल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा आणि अपघाताचा धोका निर्माण होत होता. अखेर या इमारतीच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील बसविण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून उभ्या राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या भव्यदिव्य इमारतीत रुग्णांच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष झाले होते. ‘१५० कोटींची इमारत; पण रुग्णांच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. ९ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि या इमारतीमधील प्रलंबित कामे पूर्ण करून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. इमारतीमधील त्रुटींची अवस्था कोरोना रुग्णाच्या आत्महत्येच्या घटनेवरून समोर आली होती. बांधकाम पूर्ण होईपर्यंत सुपर स्पेशालिटीच्या इमारतीच्या खिडक्यांच्या रचनेकडे प्रशासनाचे लक्ष गेले नाही. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन खिडक्यांना ग्रीन बसविण्याचे काम करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, खिडक्यांना ग्रील बसविण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.
उघडणाऱ्या भागाला ग्रील
आतापर्यंत एकूण ३४० खिडक्यांना ग्रिल्स बसवण्यात आलेले आहेत. प्रत्येक खिडकीच्या काचेचा अर्धा भाग बंद आहे, जेथे खिडकीचे पट उघडतात तेथे ग्रिल लावलेले आहे, असे विशेष कार्यअधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले.
फोटो ओळ..
घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीच्या खिडक्यांना अशाप्रकारे लोखंडी ग्रील बसविण्यात आले आहेत.
‘लोकमत’ने २९ सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेले वृत्त.