ज्ाालना : पती- पत्नी गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार असल्याने नियमित होत असलेल्या वादातून कंटाळलेल्या शुभांगी सतीश डोईफोडे हिने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.जुना जालना भागातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका महिलेचा जळालेला अवस्थेतील मृतदेह बुधवारी आढळून आला होता. शुभांगी सतीश डोईफोडे (३८) मृत महिलेचे नाव आहे.पती सतीश आणि मृत शुभांगी हे दोघे उच्च शिक्षित असून सुध्दा गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार होते. आर्थिक अडचणीमुळे दोघा पती पत्नीची चिडचिड होऊन खटके उडत असल्याची माहिती आहे. सतीश हा शहरातील एका मोटरसायकल शोरूममध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता. तर शुभांगी शहरातील एका इंग्रजी शाळेत तासिका तत्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. परंतु काही कारणावरून दोघांची नोकरी गेल्याने दोघेही तीन वर्षांपासून नोकरीच्या शोधात होते. त्यातच इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असलेल्या दोन मुलांचा खर्च आणि घर खर्च कसा भागवावा यातूनच दोघांचे वाद होत असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला. नोकरी गेल्याने सतीशला दारूचे व्यसन लागले होते. अंतर्गत वादातूनच शुभांगी हिने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. कदीम जालना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. परंतु प्रकरण खून की आत्महत्या याचा पोलिसांना तपास लावता आलेला नाही. उच्चशिक्षीत असलेली शुभांगी अशा प्रकारे आत्महत्या करेल का हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या !
By admin | Updated: January 13, 2017 00:42 IST