व्यंकटेश वैष्णव , बीडगणेश उत्सवाबरोबरच इतर सणाच्या निमित्ताने पुरवठा विभागाच्या वतीने साखर आलेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात सहा हजार क्विंटल साखर आली होती. मात्र अद्यापपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये साखर पोहोचलीच नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सणानिमित्त गोरगरीबांसाठी आलेली साखर अखेर गेली कुठे? असा सवाल जिल्हयातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात २१०० च्या जवळपास स्वस्त धान्य दुकाने असून अडीच लाखांच्यावर शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींसाठी शासनाने प्रति कार्ड दीड किलो प्रमाणे साखर नियतन मंजूर केलेले आहे. मात्र सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये साखर पोहचलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. पुरवठा विभागाची साखर वाटपाची दिरंगाई नेमकी कशासाठी? असा सवाल ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. पूर्वी पुरवठा विभागाकडून ठरवून दिलेल्या डिलरकडून स्वस्त धान्य दुकानदारांना साखर घ्यावी लागत होती. आता मात्र शासकीय गोदामातून ही साखर वाटप करण्यात येणार आहे. असे असताना देखील अद्यापपर्यंत जिल्हयातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना स्वस्त धान्य दुकानावरील साखर मिळालेली नाही. खुल्या बाजारात ३५ ते ३८ रूपये किलोने गोरगरीबांना सणासुदीच्या काळात साखर खरेदी करावी लागू नये, यामुळे तात्काळ वाटप करण्याच्या सूचना असनूही साखरेचे वाटप झालेले नाही.आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, गौरीपूजन आदी सण आहेत. अजून पहिल्या टप्यातील सहा हजार क्विंटल साखरेचे वाटप झालेले नसल्याने दुसऱ्या टप्यातील आठ हजार क्विंटल साखर लाभार्थ्यांना केव्हा मिळणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (क्रमश:)
साखर आली, कुठे गेली ?
By admin | Updated: August 19, 2014 02:12 IST