वाळूज महानगर : दीड महिन्यापूर्वी शहरातून चोरलेली दुचाकी नादुरुस्त झाल्याने पुन्हा रांजणगावातून दुसरी दुचाकी चोरणाऱ्या परप्रांतीय भामट्यास बजाजनगरात जेरबंद करण्यात आले. या भामट्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
वाळूज एमआयडीसीतून दुचाकी चोरी करणारा भामटा चोरीच्या दुचाकीवर बजाजनगरात फिरत असल्याची माहिती मंगळवारी (दि. २९) रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, पोलीस हवालदार कय्युम पठाण, पोलीस हवालदार कारभारी देवरे, पोलीस नाईक प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल नवाब शेख, दीपक मतलबे, हरिकराम वाघ, आदींनी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात सापळा रचला होता. चोरीच्या दुचाकीवरून संशयित जात असताना पोलीस पथकाने त्यास पकडले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव भीमराव बहादुरे (वय २७, रा. तुकईथड, जि. बुऱ्हानपूर, मध्य प्रदेश, ह.म.वाळूज एमआयडीसी) असे सांगितले. त्यांच्याकडे दुचाकीबद्दल विचारले असता त्याने ती रांजणगावातून चोरी केल्याची कबुली दिली.
..म्हणून चोरली दुसरी दुचाकी
आरोपी काही दिवसांपूर्वी उद्योगनगरीत रोजगाराच्या शोधात आला होता. के सेक्टरमधील एका कंपनीत रोजगार मिळाल्याने तो लगतच रूममध्ये राहत होता. दुचाकी खरेदीसाठी पैसे नसल्याने त्याने फिरण्यासाठी दीड महिन्यापूर्वी मुकुंदवाडी परिसरातुन दुचाकी (एम.एच.२०, डी.डब्ल्यु ९७०६) चोरी केली. ही दुचाकी नादुरुस्त झाल्याने त्याने उद्योगनगरीतील व्हेरॉक कंपनीच्या पार्किंगमधून अर्जुन बरडे (रा. रांजणगाव) यांची दुचाकी (एम.एच.२८, ए.ए.७२४२) २१ डिसेंबरला चोरी केली होती. आरोपीच्या ताब्यातुन चोरीच्या ५० हजार रुपये किमतीच्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
फोटो ओळ्-
बजाजनगरात चोरीच्या दुचाकीवर फिरणाऱ्या परप्रांतीय दुचाकी चोरट्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले.
------------------------