छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले. राज्य निवडणूक आयोग निवडणुकीसंदर्भात अधिसूचना कधी काढणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकेला एक पत्र मिळाले. या पत्रात तुमच्याकडे ईव्हीएम किती, बॅलेट संख्या, स्ट्राँग रूमची व्यवस्था काय, मनपा निवडणुकीत आयटी तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे कसा येईल, याची माहिती पाठविण्यास सांगितले. माहिती पाठविण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
एप्रिल २०२० पासून महापालिका निवडणूक झाली नाही. मागील पाच वर्षांपासून इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहेत. एका महिन्यात निवडणुकीची अधिसूचना काढावी, चार महिन्यांत निवडणूक घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग अधिसूचना कधी काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाकडून महापालिकेला एक पत्र आले. यात निवडणुकीच्या अनुषंगाने काही माहिती विचारण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, आयोगाने ‘मनपा’कडे ईव्हीएम मशीन किती आहेत, बॅलेट संख्या, स्ट्राँग रूमची व्यवस्था काय? मनुष्यबळ व्यवस्था आदी तपशील मागितला आहे. उद्या यासंदर्भात बैठक घेऊन लवकरच आयोगाला संपूर्ण माहिती देण्यात येईल.
मनपाकडे ६६९ ईव्हीएम होत्या, २०२० मध्ये त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्या, ३९ बॅलेट आहेत. विधानसभा निवडणुकीत मनपा हद्दीत जेवढी मतदान केंद्रे होती, त्यापेक्षा दहा टक्के जास्त असावीत, असे आयोगाने पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही जी. श्रीकांत यांनी नमूद केले.
प्रभागासंदर्भात कोणतीही सूचना नाहीमनपा निवडणुकीसाठी ३ वाॅर्डांचा प्रभाग होणार की ४ वॉर्डांचा; हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहनही प्रशासकांनी केले. राज्य निवडणूक आयोगाकडे जे निर्देश प्राप्त होतील, त्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. निवडणुकीत यापूर्वी काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यासाठी घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.