छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाचा २१.५९ कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रकमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून, पाच चष्म्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठविलेला १६ लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केला.
हर्षकुमार क्षीरसागर (२१) याने संकुलासाठी आलेल्या निधीतून २१.५९ कोटी रुपये ढापले. त्यातून त्याने आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित चष्म्यांसह विदेशी वाऱ्याही केल्या. जवळपास २४ बँक खात्यांमध्ये त्याने ही रक्कम वर्ग केली होती. कुटुंब, मैत्रिणीसह दोन मित्रांवर पैशांची उधळण करत मामा, फ्लॅट पार्टनरकडे सोन्याचे बिस्किटे, दागिने ठेवले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार याचा तपास करत आहेत. लवकरच दोषारोपपत्र सादर होईल. सर्व सबळ पुरावे गोळा केले जात असून, संकुलाच्या फॉरेन्सिक ऑडिटची मागणी पोलिस करणार आहेत.
१८० हिऱ्यांचा चष्माहर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून ४० लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा १८० हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. तो दुरुस्तीसाठी त्याने विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला अडीच लाख रुपयांमध्ये पाठविला होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केला.
एकालाही जामीन नाहीया घोटाळ्यात आत्तापर्यंत हर्षकुमार क्षीरसागर, अनिल क्षीरसागर (वडील), मनीषा क्षीरसागर (आई), हितेश आनंदा शार्दूल (मामा), यशोदा शेट्टी (सहकारी), बी.के. जीवन (यशोदाचा पती), अर्पिता वाडकर (मैत्रीण), स्वप्निल तांगडे (लिपिक, क्रीडा विभाग), सचिन रमेश वाघमारे (सहव्यवस्थापक, इंडियन बँक), नितीन नारायणराव लाखोले (लिपिक, इंडियन बँक) व नागेश श्रीपाद डोंगरे (मित्र) यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. हे सर्व हर्सूल कारागृहात असून, एकालाही जामीन मिळालेला नाही.