वडवणी : सध्या सोयाबीनच्या पिकाची काढणी सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचा पेरा कमी प्रमाणात झाला तर सोयाबीन बियाणाची बॅग महाग झाली. यावर्षी सोयाबीनच्या बॅगला जेवढा भाव होता तेवढाच भाव सोयाबीनला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा केलेला खर्चही निघणे मुश्कील बनले आहे.गतवर्षी सोयाबीनची बॅग १७०० ते १८०० रुपयांना मिळत होती. मात्र यावर्षी या बॅगच्या किंमतीत मोठी वाढ झाली. ७०० ते ८०० रुपयाने बॅगची किंमत वाढल्याने त्याची किंमत २६०० च्या वर जाऊन पोहचली. एकीकडे बॅगच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसऱ्या बाजूला सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघणे मुश्कील बनल्याचे दिसून येत आहे.दिवाळीमध्ये सोयाबीनचे पीक निघून घरी पडत असते. मात्र यावर्षी उशिराने पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्याही उशिराने झाल्या होत्या. यामध्ये सोयाबीनचाही समावेश होता. उशिराने पेरण्या झाल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे त्याच्या उत्पादनातही घट झाली. अगोदरच पेरा कमी झालेला असताना उत्पादनातही घट झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. बाजारामध्येही सध्या सोयाबीनचे पीक अल्प प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे सोयाबीन बियाणे कमी पडले होते. यावर्षीही सोयाबीनचे बियाणे कमी पडू शकते, असा अंदाज पुरवठा विभागाने वर्तविला होता. त्यामुळे सोयाबीन बियाणाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे बियाणांची किंमतही निघणे मुश्कील बनले आहे.दिवाळी सणामध्ये सोयाबीनचे पीक घरी न आल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळीतच दिवाळे निघाले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी खचून न जाता रबीच्या पेरणीची प्रतीक्षा केली होती. मात्र अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या पिकांना भाव वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (वार्ताहर)
बियाणाच्या किंमतीएवढाच सोयाबीनला भाव
By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST