औरंगाबाद आणि इंगोलस्टार या दोन शहरांमध्ये सिस्टर सिटी असे नाते निर्माण व्हावे, यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला. जर्मनीतील भारताचे उच्चायुक्त सुयश चव्हाण यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, उद्योजकांच्या सीएमआयए या संघटनेचे मुकुंद कुलकर्णी, सतीश लोणीकर, कमलेश धूत, मसिआचे अभय हंचनाळ आदी उपस्थित होते.
औरंगाबाद आणि इंगोलस्टार या दोन शहरांमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक देवाणघेवाण व्हावी, उद्योगधंद्यांबद्दल चर्चा होऊन गुंतवणुकीबद्दल काही निर्णय व्हावेत, या उद्देशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादबद्दलची माहिती जाणून घेतल्यावर सुयश चव्हाण यांनी ‘सिस्टर सिटी’ प्रकल्पाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला.