छत्रपती संभाजीनगर : बड्या सराफा व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या आरोपींच्या मोबाइलमध्ये धमकावल्याच्या कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. शिवाय, अन्य लोकांसोबतचे काही चॅटिंगचे पुरावेदेखील आहेत. मात्र, त्याबाबत तक्रारदारच समोर येण्यास तयार नसल्याने तक्रारी वाढण्याची शक्यता धूसर झाली आहे.
मंगळवारी रात्री सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून मानसी मनोहर जाधव (२४), अर्जुन प्रकाश लोखंडे (३७) व आदित्य ज्ञानेश्वर शिरे (२१, सर्व रा. भीमनगर, भावसिंगपुरा) यांना व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. जवळपास ९ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तक्रारदार सराफा व्यापाऱ्याव्यतिरिक्त या टोळीने आणखी कोणाला फसवले, याचा पोलिस आता शोध घेत आहेत. आरोपींच्या मोबाइलमध्ये दोन- तीन व्यक्तींच्या बाबतीत छायाचित्र, व्हिडीओ आहेत. मात्र, त्यांची तक्रारच दाखल नाही. शिवाय, धमकावल्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील पोलिसांना मिळून आले आहे. आज त्यांच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपत असून त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सर्व देवाण रोखीत झालाव्यापाऱ्याने कुटुंब, समाजात बदनामी टाळण्यासाठी मानसीला १५ लाख रुपये दिले. मात्र, हा सर्व व्यवहार राेखीत केल्याने त्याचे पुरावे मिळवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. पैसे दिलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजचा पोलिस आता शोध घेत आहेत. शिवाय, या पैशांचे काय केले, यासाठी पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्याची माहिती मागवली आहे.