छत्रपती संभाजीनगर : महू ते मुंबईपर्यंत भीमज्योत काढून भैय्यासाहेबांनी जनतेच्या पैशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे स्मारक उभे केले. भैय्यासाहेबांनी सरकारची, राजकीय पक्षांकडून मदत घेतली नाही. स्वाभिमानाने जेवढी मदत झाली, त्यात तेवढे स्मारक उभे राहत होते. त्यामुळे चैत्यभूमीवरील स्मारक हे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या मानाने खूप लहान आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी समाजाने भूमिका घेऊन पुन्हा एकदा लोकवर्गणीतून बाबासाहेबांचे जागतिक स्मारक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांनी केले. त्या (दि. १७ रोजी) सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात हा अभिवादन कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय मून होते. प्रमुख उपस्थिती सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. ई. हरिदास, ज्येष्ठ विधिज्ञ एस. आर. बोदडे, ज्येष्ठ विधिज्ञ डी. व्ही. खिल्लारे, भारतीय बौद्ध महासभेचे इंजि. बी. जी. म्हस्के, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत खडसे, ‘वंचित’चे राज्य प्रवक्ते तय्यब जफर आदींची होती. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी प्रास्ताविक केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रूपवते यांंनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
डॉ. संजय मून यांनी लेखक, साहित्यिक, विचारवंतांनी भैय्यासाहेबांची दखल घेतली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. इतिहासकारांनी भैय्यासाहेबांना अनुल्लेखाने मारले असल्याची टीका त्यांनी केली. अमरदीप वानखडे यांनी सूत्रसंचालन तर अनंत भवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रतनकुमार साळवे, अनंत भवरे, रमेश पटेकर, राजन कीर्तने, अविनाश सावंत, रविंद्र गवई, गजानन लांडगे, राजेश शेगावकर, बाबूराव गवई, भाऊसाहेब गवई आदींनी परिश्रम घेतले.