वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील राम मंदिरात बुधवारी (दि.२१) श्रीराम नवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सुरुवातीला प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली. कार्यक्रमाला दीपक बडे, भीमराव कीर्तिकर, निर्मला पठाडे, गंगाराम हिवाळे, नंदा बडे, सीताराम राठोड, गणेश हिवाळे, जालींदर गवळी, साईराज तांदळे आदींची उपस्थिती होती.
---------------------------
वाळूज ग्रामपंचायततर्फे औषध फवारणी
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.२१) गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. सध्या कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नागरिकात भीती आहे. कोरोनाचा संसर्ग इतरत्र पसरू नये, यासाठी सरपंच सईदाबी पठाण, ग्रामविकास अधिकारी एस.सी. लव्हाळे यांनी फवारणी करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, पोपट बनकर, नदीम झुंबरवाला, राहुल भालेराव, अमजद पठाण आदींची उपस्थिती होती.
------------------------
म्हाडा कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव
वाळूज महानगर : म्हाडा कॉलनीत विविध मूलभूत सुविधांचा अभावाने नागरिक त्रस्त झाले आहे. तीसगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या या कामगार वसाहतीत कमी दाबाने व अत्यल्प पाणीपुरवठा होतो. अंतर्गत रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकात असंतोषाचे वातावरण आहे.
----------------------
रांजणगावात सिमेंट रस्त्याचे काम सुरू
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये सिमेंट रस्त्याचे काम बुधवारी (दि.२१) श्रीराम नवमीच्या मुहुर्तावर सुरू करण्यात आले. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून जवळपास २५ लाखांचा निधी खर्च करून या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे.
-------------------------
अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्याचा शोध लागेना
वाळूज महानगर : साडेचार महिन्यांपूर्वी जोगेश्वरीतून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही. आरोपी मारोती साहेबराव चुनवडे (२९, रा.वरसणी, ता.जि. नांदेड) याने ७ डिसेंबरला या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. गत साडेचार महिन्यांपासून आरोपी मारोतीन चुनवडे याचा शोध सुरू असून तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. या आरोपीविषयी कुणाला काही माहिती असल्यास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी केले आहे.
-------------------------------