औरंगाबाद : तीन दुचाकींवरून पाठलाग करीत ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांची कार अडवली व ६ ते ७ भामट्यांनी दगडाने काचा फोडत त्यातील एका महिला अधिकाऱ्याला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात फिरोज खान जोहर खान (२३, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) व फय्याज बशीर पठाण (३०, रा. बायजीपुरा), अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दौलताबाद परिसरात घरफोडीसह दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात या दोघांना अटक केली होती. हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ‘बीएसएनएल’च्या महिला अधिकाऱ्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याची कबुली दिली. सुजाता बाबासाहेब नरवडे (४२, रा. नंदनवन कॉलनी) या जालना येथे ‘बीएसएनएल’ कार्यालयात उपमंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्या ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत ह्युंडाई कारने (एमएच-२० ईजे-०७५७) जालन्याहून औरंगाबादला येत होत्या. तेव्हा ५.३० वाजेच्या सुमारास धूत हॉस्पिटलपासून तीन दुचाकींवरील तरुणांनी कारचा पाठलाग सुरू केला.
सेव्हन हिल उड्डाणपुलावर दुचाकी आडव्या लावून ही कार थांबवली व सुजाता नरवडे यांना बाहेर बोलावत शिवीगाळ सुरू केली. या प्रकारामुळे कारमधील चारही महिला अधिकारी घाबरून गेल्या. नशेत तर्र असलेल्या तरुणांनी ‘हम प्रशांत चंद्रमोरे और अॅड. नईम शेख इनके आदमी हैं. तूम इनके ५० लाख रुपये वापस दो,’ असे म्हणत दगडाने कारच्या काचा फोडल्या व पैसे नाही दिले, तर जिवे मारण्याची धमकी देत ते सर्व जण निघून गेले. सुजाता नरवडे यांच्या तक्रारीनुसार पुंडलिकनगर ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ५ सप्टेंबर रोजी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या फिरोज खान व फय्याज बशीर पठाण यांनी सदरचा गुन्हा साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांचे साथीदार व गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलींचा शोध पोलीस घेत आहेत.