हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेच्या शनिवारी हिंगोलीत झालेल्या चिंतन बैठकीत माजी आ. गजाननराव घुगे व माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यावर आगपाखड करण्यात आली. यासंदर्भात २६ मे नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा १ हजार ६३२ मतांनी पराभव झाला. या पराभवासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी शहरातील रामाकृष्णा हॉटेल येथे शिवसेनेची चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीला उमेदवार तथा माजी खा. सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, रामेश्वर शिंदे, शिवसेनेचे जि.प.तील गटनेते अनिल कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी विविध सर्कलमधील कार्यकर्ते, शाखा प्रमुख, तालुकाप्रमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. काही कार्यकर्त्यांनी माजी आ. गजाननराव घुगे व माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पक्षाच्या अन्य नेत्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर बोलताना माजी खा. सुभाष वानखेडे म्हणाले की, पक्षासोबत गद्दारी करणार्यांना धडा शिकविला जाईल. पक्षविरोधी काम करणार्यांची माहिती यापूर्वीच पक्षश्रेष्ठींना कळविण्यात आलेली आहे. या निवडणुकीत पराभव झाला असला तरी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. विकास कामासाठी आपण सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत, असेही वानखेडे म्हणाले. या निवडणुकीतील पराभवासंदर्भात माहिती देण्यासाठी व संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी २६ मे नंतर पक्षातील नेत्यांचे एक शिष्टमंडळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेनेच्या चिंतन बैठकीत घुगे, मुंदडा यांच्यावर आगपाखड
By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST